बीड –लिंबारुई येथील ग्रामरोजगार सहायक याला साठ हजार रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मुकेश सोनाजी भोकरे (वय 47), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, ता. बीड, असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
तक्रारदाराने नरेगा योजनेअंतर्गत शेतविहिरीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी भोकरे याने तक्रारदाराकडे 61 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने भोकरे याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत शिंगारे आणि प्रभारी उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले, अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली.




Leave a Reply Cancel reply