बीड -लोणावळा येथे पी एस आय असलेल्या नाथा केकाण या अधिकाऱ्याला तब्बल वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पडकण्यात आलं आहे. हे केकाण महाशय बीड जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. खाकी वर्दीला डाग लावण्यातही बीड मागे नसल्याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या केकाण ने तक्रारदारकडून यापूर्वी तब्बल एक लाख वीस हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही पैशाची हाव कमी न झाल्याने त्याला जेलमध्ये जावे लागले आहे.
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी तक्रारदाराकडून यापूर्वी टप्प्याटप्प्याने १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्यानंतर आणखी २० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यात ही कारवाई करण्यात आली.
नाथा रामकिशन केकाण (वय ३८, पोलीस उपनिरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, रा. फ्लॅट नं. ४०१, साई व्हिजन सोसायटी, भोंडेवाडी, रावेत, पुणे) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय पुरुष तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी तसेच जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात केकाण यांनी वेळोवेळी १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि उर्वरित तपासात सहकार्य करून लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.
या तक्रारीच्या अनुषंगाने १६ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी व सापळा कारवाई केली. यावेळी लाचेची रक्कम २० हजार रुपये स्वीकारण्यास केकाण यांनी संमती दर्शवली. त्यानुसार मॅप्रो गार्डनशेजारील फूड कोर्ट परिसरात तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना सायंकाळी सव्वासात वाजता ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.





Leave a Reply Cancel reply