माजलगाव –सावकारकी करण्याचा परवाना मिळावा म्हणून 13 हजार रुपयांची लाच घेताना सह निबंधक सहित तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने अटक केली.
माजलगाव शहरातील शाहूनगर भागात शिक्षक पतसंस्थेच्यावर सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधक यांचे कार्यालय आहे. मंगळवार (दि.30) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने सापळा लावला होता. त्यांना आलेल्या तक्रारीनुसार या कार्यालयातून सावकारी परवाना देण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांना करण्यात आली होती. तडजोडीनंतर 13 हजार रुपये स्वीकारताना सहायक निबंधक सूरज जगदाळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने आणि खासगी इसम महेश फपाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





Leave a Reply Cancel reply