News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

कागदपत्र अपलोड करा अन्यथा कारवाई!

बोगस शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी!

बीड -बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी भरवणारा आदेश शिक्षण आयुक्त यांनी काढला आहे. 2012 ते 2025 या काळात भरती झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांची कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कागदपत्र अपलोड न केल्यास कारवाई केली जाईल असा ईशारा सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिला आहे.

बोगस भरतीला आळा घालण्यासाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज विभागीय शिक्षण उपसंचालक वा मंडळाच्या अध्यक्षांमार्फत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच, सन २०१२ ते २०२५ या कालावधीत ज्यांना शालार्थ आयडी देण्यात आली आहे, अशा सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही कागदपत्रे ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आदेशात देण्यात आला आहे. ‘शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णायक टप्पा आहे. शाळांनी ३० ऑगस्टपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा शिक्षण विभाग गंभीर दखल घेईल,’ असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, माजी आमदार नागो गाणार यांनीदेखील सर्व शाळांना त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत पत्र पाठविले आहे.

त्या शिक्षकांनाही कागदपत्रे अपलोड करावी लागणार
शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर जिल्ह्यातील ६२० शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यात आल्याचे पुढे आले होते. या शिक्षकांनाही शालार्थ आयडीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत. या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण आयुक्त यांच्या या आदेशाने बीड जिल्ह्यातील संस्थाचालक आणि शिक्षक यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मिळून किमान दोन हजार बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये नाना या टोपणनावाने ओळखला जाणारा एक व्यक्ती केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. 2012 ते 2025 या काळात असलेल्या आणि निवृत्त झालेल्या किंवा बदली झालेल्या शिक्षणाधिकारी यांच्या मागील तारखेत सह्या घेऊन बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे. या प्रकरणात स्थापन झालेल्या स्पेशल एस आय टी नंतर आता शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या या आदेशाने सगळ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *