बीड-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. तरीदेखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी तलावात मोटरी टाकून पाणी उपसा करत असल्याचे दिसते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माजलगाव तालुक्यात दोन ठिकाणी प्रशासनाने धडक कारवाई करत 350 मोटरी आणि 50 सोलर पॅनल जप्त केले.
माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि मंगरूळ २ या ठिकाणी होत असलेल्या अवैध पाणी उपशाविरोधात १० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अवैध पाणी उपसा करणाऱ्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल ३५० पाण्याच्या मोटारी आणि ५० सोलर पॅनेल काढून टाकण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या आक्रमक पावलामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईदरम्यान संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात आली असून, त्यांच्याकडून यापुढे जलाशयातून कोणत्याही प्रकारचा अवैध पाणी उपसा करणार नसल्याचे लेखी आश्वासन लिहून घेण्यात आले आहे. पाण्याचे महत्व आणि धरणातील पाणीसाठा लक्षात घेता ही कारवाई केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहणार नाही. भविष्यात पुन्हा अवैध पाणी उपसा सुरू होऊ नये यासाठी यापुढेही अशीच सातत्याने कारवाई चालू राहील, असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
ही व्यापक कारवाई माजलगाव धरण प्रशासन, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, पोलीस दल आणि विद्युत वितरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली. या धडक मोहिमेत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शितल माने, एस. एस. शेख, मधुकर जाधव, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी हंगे, पोलीस पाटील अल्ताफ शेख, पोलीस दलाचे उपनिरीक्षक (पीएसआय), विद्युत वितरण विभागाचे एस. बी. चव्हाण यांच्यासह ग्रामसेवक तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने आणि सक्रियपणे सहभागी झाले होते.




Leave a Reply Cancel reply