बीड – पट पडताळणी मध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने आपल्या शाळेतील शिक्षकाचे पद अतिरिक्त ठरू नये म्हणून थेट उत्तराखंड मधील विद्यार्थी खरेदी करणाऱ्या चंपावती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी हे शिक्षण विभागाच्या चौकशीत दोषी आढळले आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे निलंबन आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई होणार हे निश्चित झाले आहे मात्र या सगळ्या प्रकरणात संबंधित केंद्रप्रमुख यांच्यावर कोणती कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पटसंख्या नोंदणी पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर ही डेडलाईन असल्यामुळे चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी उत्तराखंड येथून 28 सप्टेंबर रोजी विकत घेतले त्यामध्ये प्रिन्स रामचंद्र विश्वकर्मा, अर्णव रामभवन वर्मा आणि आर्यन चंद्रशेखर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत असल्याचे दाखवून चंपावती शाळेने तसा अहवाल ऑनलाईन सादर केला आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकाला वाचवले.
हे सगळे गंभीर प्रकरण वर्तमानपत्राच्या माध्यमातून शिक्षण संचालक उपसंचालक आणि इतरांच्या लक्षात आल्यानंतर बीडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण गटशिक्षणाधिकारी श्रीमती गंगाखेडकर यांच्यासहित शिक्षण विभागाच्या पथकाने शुक्रवारी चंपावती शाळेमध्ये भेट देऊन चौकशी केली.
या चौकशीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी डाटा एन्ट्री चे काम ज्या इंटरनेट कॅफे मधून होते तेथून हा प्रकार झाला असावा असा खुलासा दिला मात्र शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेने 28 सप्टेंबर रोजी हे विद्यार्थी खरेदी केल्याचे आणि सात ऑक्टोबर रोजी परत ड्रॉप बॉक्स मध्ये टाकल्याचे उघड झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडच्या शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण यांनी आपल्या विभागाचा गोपनीय अहवाल शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांच्याकडे पाठवला आहे ज्यामध्ये चंपावती शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन यांच्याकडून गंभीर चुका झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे म्हटले आहे या प्रकरणात दोषी असणारे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली असल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान मुख्याध्यापक यांच्यासोबतच या विभागाच्या केंद्रप्रमुख श्रीमती कागदे यादेखील दोषी आहेत मात्र या अहवालात त्यांच्यावर कारवाईबाबत काय म्हटले आहे हे कळू शकलेले नाही कदाचित शिक्षण विभागाने आपल्या केंद्रप्रमुखांना वाचवले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिक्षण विभागाच्या चौकशीत दोषी आढळलेले मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर सोमवार पर्यंत निलंबन आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई होईल अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे संस्थाचालकांच्या तालावर नाचून बेकायदेशीर काम करून शासनाची फसवणूक करणाऱ्या मुख्याध्यापक आणि बोगस शिक्षक यांचे धाबे दणाणले आहे.




Leave a Reply Cancel reply