News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260625 WA0015

पडलेल्या शाळांना निधी मिळेना :एस पी च्या बंगल्यावर लाखोनी खर्च!

बीड – बीड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देताना प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात असताना, बीड पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षात तब्बल ९३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याप्रकरणी अंदाजपत्रके तयार करणारे, मंजुरी देणारे आणि जनतेच्या पैशाचा वापर करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक व विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५८ शाळा इमारतविरहित असून, १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. तसेच ७० शाळांमध्ये ९८ अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असून, इमारत बांधकामासाठी सुमारे ५७ कोटी रुपये आणि २९० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुराव्यानंतर केवळ २८ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र दुसरीकडे पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी ९३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने हा खर्च संतापजनक असल्याची प्रतिक्रिया डॉ. ढवळे यांनी दिली.

निवासस्थानातील विविध कामांमध्ये उद्यान दुरुस्ती (८.१८ लाख), बाहेरील रंगकाम (७.७५ लाख), गेस्ट रूम व मास्टर बेडरूम फर्निचर (८.४ लाख), गार्ड रूम दुरुस्ती (७.५ लाख), स्टाफ शौचालय दुरुस्ती (८.२१ लाख), चेंबर दुरुस्ती (८.२८ लाख), पाईपलाईन दुरुस्ती (६.७६ लाख), किचन ड्रेनेज व वॉटरप्रूफिंग (८.४४ लाख), बेडरूम, गेस्ट रूम व डायनिंग हॉल सुशोभीकरण (८.४३ लाख) आणि पेव्हर ब्लॉक (८.२० लाख) अशा कामांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

“ग्रामीण भागातील विद्यार्थी मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी झाडाखाली वर्ग भरतात, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही. अशा परिस्थितीत निवासस्थानाच्या दुरुस्तीवर झालेला एवढा खर्च पोलीस अधीक्षक नवनित कांवत यांना तरी पटतोय का?” असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version