गेवराई -गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथून घरकुल च्या नावाखाली तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांचा वाळू उपसा केला आहे. जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी केवळ आठ हजार ब्रास वाळूची गरज असताना तहसीलदार यांनी राक्षसभुवन येथून किमान एक लाख ब्रास वाळू उपसा केला आहे. या सर्व प्रकरणी एस आय टी स्थापन करून चौकशी करावी आणि तहसीलदार यांच्यासह दोषीवर कारवाई करावी अशी मागणी आ विजयसिंह पंडित यांनी केली आहे.
घरकुल बांधकामाच्या नावाखाली श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. तहसीलदारांसारखे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वाळू माफियांसारखे वागत असून त्यांच्या माध्यमातून महसूल, पोलीस व वाळू माफियांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे सिंडिकेट सध्या गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. अजस्त्र यंत्रसामग्रीचा वापर करून आजवर राक्षसभुवन येथील स्मशानभूमी, दशक्रिया विधीची जागा, मंडप व्यावसायिकांची जागा या वाळू उत्खननात क्षतिग्रस्त झाली आहे. गोदावरी नदीकाठच्या पुरातन मंदिरांना सुद्धा क्षती निर्माण होईल असे काम या सिंडिकेटकडून सुरू आहे.
घरकुल लाभार्थ्यांकडून ओटीपी मिळविण्यापासून ते लाखो रुपयांना वाळू विकण्यापर्यंत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल या सिंडिकेटमध्ये सुरू आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, राक्षसभुवन ग्रामस्थ, पत्रकार आदींनी याबाबत लेखी व तोंडी तक्रारी देऊनही निर्ढावलेल्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. विना नंबर प्लेटचे हायवा रात्री-अपरात्री मोठ्या वेगाने राक्षसभुवन ते बीड या महामार्गावर ये-जा करताना दिसतात. तहसीलदार आपली दैनंदिन कामे सोडून लाखो रुपयांच्या लालसेपोटी सुट्टीच्या दिवशीही गोदावरी नदीपात्रात ठाण मांडून बसत आहेत, याबाबत त्यांना वेळोवेळी जाब विचारूनही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही.
या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने विशेष एसआयटीची नियुक्ती करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे करत आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावून दोषींना शिक्षा होईपर्यंत याचा पाठपुरावा करणार आहे. राक्षसभुवन येथून होत असलेला अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा हीच मागणी पुन्हा एकदा यानिमित्ताने करत आहे.





Leave a Reply Cancel reply