अंतरवली सराटी -मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी सरकार सोबत आता आरपार ची लढाई लढण्याचा ईशारा दिला आहे. आता मंडप, कुलर लावून नव्हे तर उघड्यावर भर उन्हात आमरण उपोषण केले जाईल. एकतर मी राहिलं नाहीतर देवेंद्र फडणवीस असा ईशारा पाटील यांनी दिला आहे. सरकारने गेल्या दहा महिन्यात आपली आणि समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.सरकारला पुरेसा वेळ दिल्याचा उल्लेख करत जरांगे यांनी आता कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.
सरकार जबाबदार राहील
जरांगे म्हणाले की, तीन वर्षांपासून आंदोलन सुरू असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागत आहे. आता थांबता येणार नाही. उष्माघाताने आपला बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजातील मुलांचा उन्हाळा करून टाकल्यामुळे आता माघार घेण्याचे प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला विनंती
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला विनंती केली आहे की, उपोषण स्थळी कोणी येऊ नये. सरकार मराठा समाजाला संभ्रमात ठेवण्याचा डाव खेळत असल्याचे त्यांचे मत आहे. उपोषण स्थळी फक्त पत्रकारांसाठी एक छोटा मंडप उभारला जाईल, बाकी संपूर्ण उपोषण उघड्या उन्हातच होईल. देशात कुठेही न झालेल्या प्रकारचे हे आंदोलन असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या दिरंगाईचा आरोप
जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सातारा गॅझेटचा निर्णय अद्याप झालेला नाही. एका महिन्याच्या मुदतीत माहिती देण्याचे आश्वासन दिले होते, तरी दहा महिने उलटले तरी काहीच झाले नाही. गुन्हे दाखल करून आंदोलकांवर दबाव टाकला जातो, पण गुन्हे मागे घेतले जात नाहीत. मराठा-कुणबी एकच आहेत, असे वारंवार सांगितले जाते, तरीही एकत्रित जीआर काढला जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी किती वेळ लागणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
१९६७ पासून अन्याय
१९६७ पासून सरकारने मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. समाजाचे नुकसान कोण भरून काढणार, असा सवाल करत त्यांनी आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने, कायदेशीर लढाई सर्व काही केल्याचे सांगितले. तरीही आरक्षण मिळाले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाची गरज असते का, असा खडा सवालही त्यांनी केला.
आरपारची लढाई
जरांगे यांनी स्पष्ट केले की, आता आरपार खेटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे उपोषण होईल. मराठा समाजाला यामुळे वाईट वाटू शकते, पण परिस्थितीमुळे कठोर भूमिका घेणे भाग पडत आहे.
या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता शेवटच्या टप्प्यात जाण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त करतानाच, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, याचा इशाराही दिला आहे.





Leave a Reply Cancel reply