मुंबई –राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचे जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
या योजनेत केवळ कर्जमाफीच नव्हे, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे.
अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना पहिल्या दहा काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.
महात्मा फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एक समिती स्थापन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतील.
संत गाडगेबाबांचं 150 वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.
२०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल.
संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जतन आणि संवर्धन करू.
16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राकडून भरीव निधी प्राप्त होणार आहे. सहाव्या वित्त आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली होती. त्यांचा अहवाल राज्यपालांच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल.
1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल.
बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल.
संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, कुक्कुटपालकांसाठी विशेष योजना करण्यात येणार आहे.
1 कोटीची मुख्यमंत्री मत्स्य योजना करण्यात येत आहे.












Leave a Reply