दादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा सावळागोंधळ!
बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात प्रशासनात अधिकाऱ्यांची वाणवा निर्माण झाली आहे. अक्षरशः एका शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा पदभार देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. बीड जिल्हा परिषदेत बहुतांश कर्मचारी अतिरिक्त कार्यभार सांभाळत असल्याने सगळाच सावळागोंधळ निर्माण झाला आहे.
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आल्यानंतर बीड जिल्ह्यातील प्रशासन स्वतः सारखे सरळ होईल अशी अपेक्षा होती . अजित दादांनी देखील पहिल्याच बैठकीत प्रामाणिकपणे काम करा विकास कामांना खोडा घालू नका फाईलची पेंडन्सी ठेवू नका अशा सूचना दिल्या होत्या.
मात्र बीड जिल्ह्यातील महसूल असो की जिल्हा परिषद प्रशासन यांनी अजितदादांचे आदेश धाब्यावर बसवण्याचे चित्र आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा पदभार हा निदान उप अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवणे गरजेचे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी जी तीन रहमान यांनी मात्र परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेल्या ओबी बिडकर या शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा पदभार दिला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जल जीवन मिशनचा कारभार ज्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत चालतो त्या विभागाला सक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे मात्र गेल्या तीन-चार वर्षात या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून शाखा अभियंता किंवा उपअभियंता यांच्याकडे कारभार देऊन कामं भागवण्यात आले.
विद्यमान प्रभारी कार्यकारी अभियंता धाबेकर हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर बीडकर या शाखा अभियंत्याला पदभार देण्यात आला आहे. बीडकर यांची शाखा अभियंता म्हणून नियुक्ती होऊन सहा महिने देखील झालेले नाहीत, त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झालेले नाही. अशावेळी एवढ्या मोठ्या पदावर अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे पदभार देऊन सिइओ कोणाचे भले करत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड जिल्हा परिषदेत जवळपास शंभर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. एकीकडे विभागीय आयुक्त यांच्या परवानगी शिवाय प्रतिनियुक्ती करता येतं नसताना बीड जिल्हा परिषदेत मात्र शेकडो कर्मचारी अतिरिक्त कारभार करत आहेत. सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा, वित्त विभाग, बांधकाम विभाग अशा महत्वाच्या विभागाचा कारभार अतिरिक्त कर्मचारी पाहत आहेत.
अजित पवार ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जर महत्वपूर्ण जबाबदारी च्या पदावर अनुभव नसलेल्या लोकांना नियुक्त करणारं असतील तर स्वच्छ आणि पारदर्शक कारभार कसा होणार असा सवाल उपस्थित होतं आहे.स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी येणारे दादा याकडे लक्ष देणार कां आणि मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करणारं कां हाच खरा प्रश्न आहे.












Leave a Reply