नवी दिल्ली- आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने सुरवात केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी सोबतच तामिळनाडू मधील रामनाथपुरम येथूनही निवडणूक लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रामेश्वरम या तिर्थक्षेत्राच्या सानिध्यात दक्षिणेकडे लक्ष देण्याची भाजपची योजना असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदी हे पुढील वर्षी लोकसभा निवडणूक दक्षिणेकडील राज्यातून, प्राधान्याने तामिळनाडूमधून लढवण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. जर पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमधून लोकसभेची निवडणूक लढवली तर ते दुसऱ्या ठिकाणी म्हणजे सध्याच्या वाराणसी मतदारसंघातूनही निवडणूक लढवतील असंही सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये वडोदरा आणि वाराणसी या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्ये त्यांनी फक्त वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, यावर्षी तामिळनाडू आणि वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तामिळनाडूमधील एका मतदारसंघाचा पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विचार केला जाऊ शकतो. तो मतदारसंघ म्हणजे रामनाथपुरम या मतदारसंघात रामेश्वरम हे हिंदू तीर्थक्षेत्र आहे.
भाजपच्या रणनितीचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी तामिळनाडूमधून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नमल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतरपासून हा मुद्दा चर्चेत आला आहे.
दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळून लोकसभेच्या एकूण 129 जागा आहेत. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही एक जागा आहे. 2019 मध्ये 303 जागा जिंकणाऱ्या भाजपला या 130 जागांपैकी फक्त 29 जागा मिळाल्या आहेत. त्यात कर्नाटकातील 25 जागांचा समावेश आहे. दक्षिणेकडील तीन राज्यांमध्ये (तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश) भाजपचे खातेही उघडले नाही. सर्व्हेनुसार, आता निवडणुका झाल्यास महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपला झटका बसू शकतो. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील इतर राज्यांतून कमी झालेल्या जागांची भरपाई भाजप करू शकतो.
Leave a Reply