News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पवित्र पोर्टल द्वारे होणार भरती!

बीड -राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती ही पवित्र पोर्टल द्वारे करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून लवकरच भरती प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे २५ हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी साडेनऊ ते दहा हजार पदे सध्या रिक्त आहेत. मात्र, २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. तत्पूर्वी, शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयाने ‘स्टेटस को’ दिला असून आता न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
माध्यमिक शाळांमध्ये ८५०० शिक्षकांची भरती
खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे. प्रत्येक पदासाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या संस्थांमध्ये पाठविले आहे. त्यांच्या मुलाखती होऊन निवड झालेल्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल. साधारणत: साडेआठ हजार शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असून ३० जूनपर्यंत ते सगळेजण नियुक्ती होतील, असे नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली.
संस्थांनाच भरावी लागणार शिपाई पदे
शासनाच्या निर्णयानुसार वर्ग-४ मधील पदभरती बंद झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिपाई पद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही. शिपाई पद आता कायमचे रद्द झाल्याने शाळांमधील शिपायांची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वत:हून शिपाई पदे भरावी लागणार आहेत. त्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version