News & View

ताज्या घडामोडी

aadi anant et00521921 1791724793

संकर्षण रडवलंस मित्रा………….!

विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर.


एखाद्या कलाकाराला प्रेक्षकांची दाद तेव्हाच मिळते जेव्हा तो जीव ओतून काम करतो. सिनेसृष्टीत असं नेहमीच म्हटलं जात कि, एखादा खलनायक जेव्हा पडद्यावर आपला अभिनय सादर करतो अन समोर बसलेले प्रेक्षक त्याला शिव्या घालतात तेव्हा त्या शिव्या नसतात ती त्याच्या अभिनयाची पावती असते.एखादा चित्रपट केवळ अभिनेता, अभिनेत्री यांच्या अभिनयावरच यशस्वी होतो असं नसतं तर त्याला तेवढी जबरदस्त कथा सुद्धा असावी लागते.संकर्षण कऱ्हाडे याची कथा असलेला ‘आदी अनंत ‘पाहिल्यानंतर एकच शब्द तोंडातून बाहेर पडला तो म्हणजे संकर्षण रडवलंस मित्रा…….!हा शब्द तोंडातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा दहा मिनिट लागली कारणं डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं त्यामुळे शब्दच फुटत नव्हते.(यापूर्वी आशुतोष गोवारीकर यांच्या व्हेंटिलेटर ने देखील असाच नाजूक आणि भावनिक विषय हाताळला होता.) खरोखरच प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी नक्कीच पहायला हवा.नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र आणि आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र हे या चित्रपटातून अनुभवायला मिळतं.

संकर्षण हा तसा आमच्या शेजरच्या म्हणजे परभणी जिल्ह्यातला. त्यामुळे तो कितीही मोठा कलाकार झाला म्हणजे आता आहेच पण याहीपेक्षा मोठा झाला सुपर डुपर स्टार झाला तरीही आम्ही त्याला अरे तुरे च म्हणणार कारणं त्यात जो आपलेपणा आहे तो दुसऱ्या कशात नाही.

12 नोव्हेंबर 2026 रोजी महेश लिमये यांचं दिग्दर्शन असलेला आणि या वयातही अभिनयावर पूर्णपणे कमांड असलेल्या अशोक सराफ अर्थात अशोक मामा यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट. संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश सिरसाट (हा सुद्धा आमच्या मराठवाड्याचा एक गुणी कळावंत ) यांनी या चित्रपटला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.

खरं तर अलीकडच्या काळात सिनेमा गृहात जाऊन पाहावे असे मराठी किंवा हिंदी चित्रपट येतं नाहीत. लोकांच्या हातात असलेल्या मोबाईल नावाच्या राक्षसामुळे लोक सिनेमागृहात जात नाहीत ही खरी गोष्ट आहेच पण तेवढ्या ताकदीची संहिता अर्थात कथानक सुद्धा नसतात हे ही एक कारणं आहेच.

आदी अनंत मात्र यात बसत नाही.हा चित्रपट पाहताना आपण थिएटर मध्ये नाही तर घरात आहोत असं वाटतं राहतं. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील माझ्या पाहण्यात आले नाहीत अन आईच्या वडिलांसोबत कायम राहणे शक्य नव्हते. पण आदी अनंत मध्ये संकर्षण आणि अशोक मामा या आजोबा नातवाच जे बॉँडिंग दाखवलं आहे ते मी माझ्या आई वडिलांसोबत अनुभवलं आहे.

मराठी चित्रपटाला थिएटर मिळतं नाहीत अन थिएटर मिळाले तर मराठी प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतो अशी अवस्था सगळीकडे दिसून येते. बीडमध्ये सुद्धा हा चित्रपट एक दिवस उशिरा लागला आणि दुपारच्या शो ला मोजून बारा प्रेक्षक उपस्थित होते हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण या चित्रपटाने किती व्यवसाय केला यापेक्षा याच कथानक मनाला भावणार आहे हे नक्की.

पहिला भाग म्हणजे मध्यंतर होईपर्यंत हलका फुलका वाटणारा हा चित्रपट नंतर मात्र गंभीर वळण घेतो आणि थिएटर मध्ये असलेला प्रत्येक जण खुर्चीला खिळून कधी बसतो हे त्याच त्यालाच कळतं नाही. मध्यंतरानंतर प्रत्येक सिन हा इमोशनल करून जातो. आपण आपल्या घरातल्या आई वडील किंवा आजी आजोबा यांच्यासोबत कसे वागतो किंवा ते असताना कसे वागत होतो हे आठवत राहते.

या आजोबा नातवातील अनेक संवाद काळजाला भोक पाडून जातात. एकीकडे स्वतःच करियर, स्वतःची स्वप्न यासाठी धडपडणारा नातू आणि दुसरीकडे बेड रीडन असलेल्या आजोबाच करता करता नाकीनवू आलेला नातू, त्याच्या मनातील घालमेल, आजोबांवर होणारी चिडचिड,आणि त्यानंतर त्याला झालेला पश्चाताप हे हदरवून सोडणार आहे.

मध्यंतरापूर्वी हलक्या फुलक्या विनोदाने हसवणारा हा चित्रपट नंतर मात्र काळजाचा ठोका चुकवतो. उतारवयात घरातील वृद्ध लोकांची होणारी ससेहोलपट, त्यांच्या दुखण्यात नातेवाईकांना होणारा त्रास, त्यांची होणारी चिडचिड. हे करू नका म्हणलं कि मुद्दाम करण्याची सवय लागलेले म्हातारे हे सगळं प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःशी रिलेट करतं.

2016 साली वडील आणि 2019 ला माझी आई जेव्हा गेली त्यापूर्वी त्यांनाही दवाखान्यात काही दिवस न्यावं लागलं होतं. त्यांच्या शेवटच्या दिवसात आम्ही त्यांची काळजी घेतली त्यामुळं संकर्षण म्हणजे आदित्य आणि अशोक मामा म्हणजे अनंतरावं यांच्यातील नातं डोळ्यातून पाणी यायला कारणीभूत ठरलं.खरोखरच संकर्षण हा चित्रपट किंबहुना त्याची कथा काळजात घरं करून गेली यार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version