बीड –बीड शहरातील सुमती नगर भागातुन वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये मधोमध भुमाफियानी भिंत बांधून नदीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. याबाबत न्यूज अँड व्यूज ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. सदरील बेकायदेशीर भिंत बांधकाम बंद करून महसूल विभागाने भुमाफियाना दणका दिला आहे.
बीड शहरातील नदी, नाले, ओढे यावर भुमाफियानी अतिक्रमण करत प्लॉटिंग सुरु केली आहे. एकीकडे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या नद्याचे पुनःरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करत असताना बीडमध्ये मात्र भुमाफिया नद्यामध्ये भरावं टाकून अतिक्रमण करत आहेत.
शहराच्या दक्षिण बाजूला असलेल्या सुमती नगर भागातून वाहणाऱ्या करपरा नदीच्या पात्रात अशाच प्रकारे नदी अडवून भिंत बांधकाम सुरु असल्याचा प्रकार न्यूज अँड व्यूज ने उघडकीस आणला.
याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत मंडळ अधिकारी अनिल तांदळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने स्पॉट पंचनामा केला. या भागातील शेतकरी अरुण काळे, विश्वम्भर काळे, सखाराम काळे यांना जागेवर नोटीस देऊन भिंतीचे बांधकाम तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
या भागात भुमाफियानी करपरा नदी पात्रातील तीन ते चार दरवाजे बंद करून जवळपास तीस ते चाळीस फूट जमिनीवर अतिक्रमण केले असून उत्तरेकडील बाजूने देखील नदीच्या मधोमध भिंत बांधण्याचे काम सुरु केले होते. अशाच प्रकारे बीड शहराच्या मधून वाहणाऱ्या बिंदूसरा नदीत देखील कृष्ण मंदिराच्या पाठीमागील बाजूने भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. याकडे मात्र अद्याप महसूल ने लक्ष दिलेले नाही.
बीड शहरातून वाहणारे नदी, नाले, ओढे बुजवून भुमाफियानी प्लॉटिंग केलेली आहे. नाडीपत्राच्या शेजारी पूर नियंत्रण रेषेत मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले आहे. विशेषतः कृष्ण मंदिर शेजारी मोठ्या प्रमाणात भिंत बांधून बंगले बांधण्याचे काम सुरु आहे. भविष्यात 1989 प्रमाणे महापूर आल्यास होणाऱ्या जीवित आणि वित्तहानी ला कोण जबाबदार असणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. याकडे सुद्धा महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.




Leave a Reply Cancel reply