बीड –बीड शहरातील भुमाफियानी नदी, नाले, ओढे, ओपन स्पेस ढापण्याचे काम सुरु केले आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या नदी पुनःरुज्जीवन आणि संवर्धन यासाठी प्रयत्न करत असताना बीडमध्ये मात्र भुमाफिया नदीत भिंती उभारू लागले आहेत. करपरा नदीत भिंत उभराल्यानंतर आता बिंदूसरा नदीतदेखील भिंत बांधून भुमाफियानी नदीवर अतिक्रमण केले आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
बीड शहरातील सुमती नगर भागातुन वाहणाऱ्या करपरा नदीत मधोमध भिंत बांधून काही भुमाफियानी नदीचे पात्र अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भविष्यात महापूर आल्यास या ठिकाणी असणारे शेतकरी आणि रहिवासी यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
करपरा मधील अतिक्रमण बाबत न्यूज अँड व्यूज ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आता नवे प्रकरण समोर आले आहे. शहरांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बिंदूसरा नदीमध्ये अमरधाम स्मशान भूमी समोर आणि कृष्ण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस काही भुमाफियानी नदीत भिंत बांधली आहे.

वरील छायाचित्रात स्पष्ट पणे दिसत आहे कि, बांधलेली नवी भिंत ही जवळपास वीस फूट पुढे घेऊन ही सर्व नदीची जागा हडप करण्यात आली आहे. ही भिंत बांधताना नदीत येणारे जालना रोडवरील पाणी वाहून आणणारा नाला देखील बुजवून त्याठिकाणी पाईप टाकून पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

एकीकडे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या राज्यातील नद्याचे पुनःरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच बीड शहरातील दोन मुख्य नद्यावर अतिक्रमण करून भुमाफियानी त्या वर प्लॉटिंग केली आहे. विशेष म्हणजे महसूल प्रशासन असो कि भूमिअभिलेख अथवा नगर रचना विभाग यांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होतं असल्याचे चित्र आहे.




Leave a Reply Cancel reply