बीड –बोगस शालार्थ आयडी, नोकर भरती आणि इतर गैरप्रकार बाबत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या चौकशी पाठोपाठ बीडमधील नावाजलेल्या चंपावती शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत. किरण देशपांडे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, अमरावती, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर राज्य सरकारने राज्यस्तरीय एस आय टी स्थापन केली.
विदर्भाप्रमाणे मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात अनेक संस्थामध्ये बोगस भरती झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर चे शिक्षण उपसंचालक यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. मात्र या समिती मध्ये बोगस शालार्थ आयडी प्रदान करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्यांचाच समावेश असल्याने चौकशी निष्पक्ष होईल कि नाही याबाबत शंका उपस्थित होतं आहे.
अशातच आता भाशिप्र पाठोपाठ बीडच्या नावाजलेल्या चंपावती संस्थेची देखील चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थेत गडबड करणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांची पाचावर धारण बसली आहे.
चंपावती संस्थेत गेल्या अनेक वर्षात 2012 ते 2025 या काळात किमान 40 ते 50 शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला नोकरी करायची आहे त्यांनी अध्यक्ष अथवा पदाधिकारी यांना भेटायचे, नंतर ठरलेला प्रोटोकॉल करायचा आणि जॉईन व्हायचे. त्यानंतर दरवर्षी अप्रूव्हल काढण्यासाठी ठरलेला खर्च करायचा. एकदा कन्फर्म झाले कि मागील एरियर्स काढण्यासाठी पैसे द्यायचे आणि आलेले एरियर्स संस्थेच्या अध्यक्षाच्या हातात नेऊन द्यायचे असा प्रकार येथे झालेला आहे असे तक्रारीत म्हटले आहे.
या संस्थेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांनी आपले भाचे, पुतणे, भाऊ, भावजयी, बहिणी यांच्यासह अनेकांना नोकरीत घेतले आहे. विशेष बाब म्हणजे यातील अनेक जण हे टीईटी परीक्षा देखील अनुत्तीर्ण आहेत. तरीदेखील आपले आहेत म्हणून ही खोगिरभरती केली गेली आहे.




Leave a Reply Cancel reply