News & View

ताज्या घडामोडी

images 38

महिलेच्या पोटात ग्लोज अन टीश्यू पेपर!जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार!

बीडबीडच्या जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शल्य चिकित्सक डॉ सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे समोर आले आहे. सिझेरियन केलेल्या एका महिलेच्या पोटात ग्लोव्हज आणि टीश्यू पेपर राहिल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

आरोग्य खात्याचे कारनामे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोर्‍या रूग्णांच्या मुळावर उठला आहे. बाळांतपणासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेचे सिझर करण्यात आले. सिझर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर गोंडस बाळाला जन्म दिला. रूग्णालयातून सुट्टीही देण्यात आली. चार दिवसानंतर पोटाचा प्रचंड त्रास सुरू झाला. खाजगी रूग्णालयामध्ये तपासण्या केल्या असता शस्त्रक्रिया करताना मेडिकल ग्लोज आणि पेपर पोटातच राहिल्याचे स्पष्ट झाले. सध्या ही महिला ससूनमध्ये उपचार घेत असून तिची प्रकृती गंभीर झाली आहे.


बीडचे जिल्हा रूग्णालय गेल्या काही महिन्यात वादाच्या भोवर्‍यात अडकले आहे. ना शिस्त, ना नियोजन, ना कोणाचा धाक, भरमसाठ पगारा असूनही बळजबरीने कामाला जुंपल्यासारखे काम केले जात आहे. संपूर्ण आरोग्य विभागच निष्क्रिय आणि बेजबाबदार झाला आहे. पंधरा दिवसापूर्वी बीडची १९ वर्षीय महिला संध्या सुरज गायकवाड यांना बाळांतपणासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यांच्यावर तातडीने सिझरची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया दरम्यान डॉक्टांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात मेडिकल ग्लोज आणि पेपर नॅपकीन राहिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. महिलेच्या पोटात जास्त वेदना होवू लागल्याने तिला खाजगी रूग्णालयामध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर पोटात काहीतरी अनोळखी वस्तू असल्याचे स्पष्ट झाले.

संध्या गायकवाड यांची प्रकृती वेगात खालावत गेल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीने पुण्याच्या ससून रूग्णालयात हलवले. तेथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली असता संध्या गायकवाड यांच्या पोटात वैद्यकीय हातमोजे आणि कागदी रूमाल बाहेर काढल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे संध्या यांच्या पोटामध्ये गंभीर संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

आपल्या पत्नीची ही अवस्था केवळ बीडच्या जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाली असून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सुरज गायकवाड यांनी केली आहे.

सीएसकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणी बीडमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक सोळंकी यांनी चौकशीचे आदेश देत शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशीसाठी समितीही स्थापन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version