परभणी -गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणी परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मोरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजय पांचाळ या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य सेवेतील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परभणीच्या जिंतूर येथील शेख अमीना शेख आयुब या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला परभणी स्त्री जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र महिलेची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र दोन तास ताटकळ थांबूनही 108 रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेच्या आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता.
ही घटना अत्यंत गंभीर असून परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखन मोरे यांनी त्यांच्याकडे असलेली नियंत्रकीय व प्रवेशकीय जबाबदारी योग्यरीत्या पार पडली नाही म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे यासोबतच त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय लातूर येथील मंडळ अधिकारी कार्यालय राहणार आहे. निलंबन काळात त्यांना कुठलेही खाजगी नोकरी अथवा काम करता येणार नाही.
यासोबतच परभणीच्या जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ हे कामात अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशा माथूर यांनी आरोग्य विभागाकडे सादर केला होता. या अहवालाची गंभीर दखल घेत डॉक्टर संजय पांचाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांची देखील विभागीय चौकशी केली जाणारा असून चौकशी दरम्यान त्यांचे मुख्यालय धाराशिव हे राहणार आहे.




Leave a Reply Cancel reply