News & View

ताज्या घडामोडी

images 1

मनोज जरांगे यांच्या आरोपावर बीड जिल्हा प्रशासनाचा खळबळ जनक खुलासा!

बीड -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला पत्र दिल्याचा दावा बीड जिल्हा प्रशासनाने खोडून काढला आहे. या प्रकरणात महसूलमंत्री यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार पाच दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मराठा समाजाच्या काही लोकांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी स्वतः बावनकुळे यांनी पत्र दिल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. आमच्या समाजाच्या लोकांची प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे असा ईशारा देत पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती.

त्यानंतर या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राबाबत करण्यात आला आहे. बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानुसार, महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला केवळ चौकशी करण्याबाबत पत्र पाठवले होते. कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोणत्याही सूचना महसूल मंत्र्यांकडून देण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच, महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेखा अंबुरे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये आरोप केले होते. या आरोपांवर आता बीड प्रशासनाने अधिकृत पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रेखा अंबुरे यांच्या प्रकरणात आवश्यक चौकशी करण्यात आली असून, संबंधित नमुना-33 संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कोणत्याही कागदपत्रांची ऑनलाइन अपलोडसाठी प्रलंबित स्थिती नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकृत स्पष्टीकरणातून म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version