बीड – शहरातील धानोरा रोड भागात उभारण्यात आलेल्या रेल्वेच्या स्थानकापासून ते बार्शी रोड कडे जाणाऱ्या रेल्वे पटरी पर्यंत रेल्वे खात्याकडून बांधण्यात आलेली संरक्षण भिंत अनेक ठिकाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्ष दीड वर्षांपूर्वी बांधलेली ही भिंत अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळेच जागोजागी खचू लागली असून याकडे लक्ष द्यायला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या अनेक दशकापासून बिडकर ज्या रेल्वेच्या प्रतीक्षेत होते ते नगर बीड परळी ही रेल्वे बीड पर्यंत आली असून बीड पासून परळी कडे रेल्वे ट्रॅक चे काम जोरात सुरू आहे. मात्र रेल्वे ट्रॅक किंवा त्यादरम्यान उभारण्यात आलेले पूल असो अथवा कंपाउंड वॉल यांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
धानोरा रोड भागात असलेल्या रेल्वे स्थानकापासून ते बार्शी रोड पर्यंत रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जेवढी जागा रेल्वेने ताब्यात घेतलेली आहे त्या जागेवर कंपाउंड वॉल अर्थात संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. साधारण वर्ष दीड वर्षांपूर्वी बांधलेली ही भिंत महिनाभरापूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडली आहे.
धानोरा रोड भागात बलगुजा येथे राहणारे शेतकरी बाबुराव सिताराम पिंगळे यांच्या शेताच्या बाजूने बांधण्यात आलेली रेल्वे ची संरक्षक भिंत जिची लांबी जवळपास 140 मीटर आहे ती पडल्याने या शेतकऱ्याचे आंबा चिकू व इतर फळझाडांचे आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी कंपाउंड वॉल पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पावसाळ्याच्या दिवसात इतर ठिकाणची कंपाउंड म्हणून जीवित अथवा वित्तहानी होण्याची भीती आहे याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी अद्याप पर्यंत या तक्रारीची दखल कोणीही घेतलेली नाही.





Leave a Reply Cancel reply