लातूर –एमआयडीसी मध्ये औदयोगिक वापरासाठी असलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या क्लास चालकांना जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. या भागात सुरु असलेले क्लास, हॉस्टेल आणि खाणावळी तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. या आदेशामुळे एकच खळबळ उडाली आहे.
औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या जागांमध्ये सुरू असलेले कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, वस्त्रालयं तसेच इतर व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या निर्णयामुळे लातूरच्या ट्युशन भागात मोठी खळबळ उडाली आहे.
लातूरमधील औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगांपेक्षा खासगी कोचिंग क्लासेस आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार २०११ पासून या संदर्भात सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करण्यात येत होत्या. औद्योगिक वापरासाठी देण्यात आलेल्या जवळपास २७ एकर परिसरातील अनेक भूखंडांवर उद्योग उभारण्याऐवजी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल आणि इतर व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात आले. अनेक वेळा कारवाईची आश्वासनं देण्यात आली, काही ठिकाणी कारवाईदेखील झाली, मात्र परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.
औद्योगिक वसाहतीतील खासगी कोचिंग क्लासेस आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता पालकांकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असून ही व्यवस्था बंद करू नये असं पालकांचं मत आहे. एकेकाळी उद्योगांसाठी उभारण्यात आलेला हा परिसर आता संपूर्ण राज्यात ‘ट्युशन एरिया’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोठमोठे उद्योग बंद पडत गेले आणि त्याजागी खासगी कोचिंग क्लासेसचे जाळे निर्माण झाले. नामांकित कोचिंग संस्थांनीही या भागात आपले केंद्र उभारत संपूर्ण परिसराला कोचिंग इंडस्ट्रीचे स्वरूप दिले.
मात्र नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयकडून अटक झाल्यानंतर लातूरच्या क्लास संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाच्या नव्या आदेशानंतर औद्योगिक वसाहतीतील व्यवसायांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.





Leave a Reply Cancel reply