पुणे –नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ने सोमवारी मोठी कारवाई केली. रुक्मिणी कोचिंग क्लासेस अर्थात आरसीसी चे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मोटेगावकर हाच खरा मास्टरमाईंड असून त्याने हा पेपर लीक केल्याची माहिती आहे.
शैक्षणिक क्षेत्रात शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचे मोठं नाव असून त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. नीट परीक्षा फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचं कनेक्शन आहे का? याचा तपास सीबीआयकडून सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे.
नीट परीक्षा फुटीप्रकरणी लातूर, पुण्यानंतर आता आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या चौकशीची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालीयं. मागील तीन दिवसांपासून मोटेगावकरांची चौकशी सुरु असून तब्बल 11 तास ही चौकशी सुरु आहे. मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्राभर आहेत. त्यामुळे राज्यात सध्या चांगलीच चर्चा सुरु झालीयं.
लिक पेपर शिवराज मोटेगावरांच्या संस्थेकडून मिळालेला होता का? याचा तपास सीबीआयच्या पथकाकडून सुरु आहे. तर पेपर लिक प्रकरणी लातूरच्या प्रल्हाद कुलकर्णीला अटक केल्यानंतर प्राध्यापक मनिषा मांढरेसह मनिषा वाघमारेलाही अटक करण्यात आलीयं. मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचा काही कोटींमध्ये टर्नओव्हर असून व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय बनलायं.
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून ज्यांनी पेपर सेट केला, त्यांनीच पेपर फोडल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात उघड झालं आहे. या पेपर घोटाळ्यात प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी आणि प्राध्यापिका मनिषा मांढरे यांची मोडस ऑपरेंडी सीबीआयच्या तपासात उघड झालीयं. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली.
नीट पेपर घोटाळ्याची साखळी देशभरात पोहोचलेली असून पुण्यापासून ते थेट राजस्थानपर्यंत या घोटाळ्याची साखळी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पेपर घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी दिल्ली, पुणे, जयपूर, नाशिक अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक केली असून त्यापैकी पाच आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं. तर प्रल्हाद कुलकर्णी आणि मनिषा वाघमारेला दहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीयं.





Leave a Reply Cancel reply