मुंबई -भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधा वरून उपजिल्हाधिकारी भांडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमधे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे यांचे अशोक खरात याच्यासोबतचे कॉल रेकॉर्ड हाती आल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यामध्ये अनेक वेळा फोनवरून बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. निलंबन आदेशानुसार, भांडे-पाटील यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींमध्ये गुन्हेगारी, फसवणूक तसेच शोषणाशी संबंधित कथित प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या वर्तनामुळे सरकारची प्रतीमा मलीन झाल्याचेही म्हटले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ अंतर्गत हे कृत्य गैरवर्तनाच्या स्वरूपात येत असल्याने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार भांडे-पाटील यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात ठेवण्यात आले आहे.





Leave a Reply Cancel reply