News & View

ताज्या घडामोडी

images 1

भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!

बीड – बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक चा चुना लावल्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली त्यानंतर या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागात असलेल्या एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे पैसे लाभार्थी,त्यांचे वकील, महसूल मधील अधिकारी कर्मचारी आणि दलालांना वाटप झाले त्या बँकेवर आणि स्थानिक सल्लागार व्यापारी यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या यामध्ये मुख्य आरोपी हे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक असल्याचा दावा करत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती.

या भूसंपादन घोटाळ्यामध्ये भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संजय हंगे यांच्यासहित डी टी पी ऑपरेटर क्लार्क यांनी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आणि वकील या सगळ्यांशी संगणमत करून तब्बल 241 कोटी रुपयांचा अपहार केला शासनाची फसवणूक केली.

या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी बीड चे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाल्यानंतर अनेक उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी ट्रेझरी ऑफिसर यांच्यासहित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात स्वतःला फार साव (शाहू )समजणाऱ्या या बँकेला यापूर्वी देखील अशाच एका प्रकरणात आरबीआय ने कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठवला होता. भू संपादन घोटाळ्यात तर या बँकेने सर्व हद्द पार करत नियम आणि अटी पायदळी तुडवत भ्रष्टाचार करणाऱ्यांना साथ दिली आहे, त्यामुळे एसआयटी कडून या बँकेची आणि स्थानिक सल्लागाराची चौकशी होणार आहे.

शासनाकडून लाभार्थ्यांना मावेजा मंजूर झाल्यानंतर तो त्यांच्या बँकेत चेक द्वारे किंवा आरटीजीएस ने जमा होतो या प्रकरणात मात्र बहुतांश लाभार्थ्यांचे खाते हे बीडच्या भाग्यनगर भागात असलेल्या आणि महापुरुषांच्या नावाने गेल्या अनेक वर्षापासून बँकिंग क्षेत्रात नावारूपास आलेल्या एका सहकारी बँकेत उघडण्यात आले खाते उघडताना ना लाभार्थ्याचे आधार कार्ड मागितले गेले ना पॅन कार्ड थेट लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून महावेजापोटी मंजूर झालेली रक्कम जमा करण्यात आली आणि त्याच दिवशी यातील वकिलांचा हिस्सा संजय हंगे आणि इतरांचा हिस्सा तसेच दलालांचा हिस्सा आणि उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांचा हिस्सा तातडीने वाटप करण्यात आला.

विशेष बाब म्हणजे बँकेने कुठलीही कागदपत्रे न तपासता एकाच दिवशी अनेक खाते ज्या पद्धतीने उघडले आणि त्यातील रक्कम विड्रॉल करून दिली त्याला या बँकेतील एक स्थानिक सल्लागार कारणीभूत असल्याची चर्चा आहे. हा सल्लागार बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून, फोनवर खाते उघडण्यास अन पैसे विड्रॉल करून देण्यासाठी सांगत होता. पेठ बीड भागातील हा व्यापारी माने कॉम्प्लेक्स भागात राहतो अशी देखील चर्चा आहे. त्याचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याची माहिती आहे.

महापुरुषांच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात शाखांचे जाळे असलेल्या या बँकेच्या भाग्यनगर शाखेतून मात्र काळे धंदे करणाऱ्यांना पाठबळ देण्यात आले. त्यामुळे ज्या पद्धतीने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात बँकेची चौकशी झाली तशाच पद्धतीने या बँकेची आणि त्या स्थानिक सल्लागाराची देखील एस आय टी मार्फत चौकशी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version