बीड –राज्यभरात पटपडताळणी करून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी तयार करावी आणि त्यानंतर त्यांचे समायोजन करावे असे आदेश शिक्षण संचालक यांनी दिले. मात्र बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी पटपडताळणी पूर्ण होण्या अगोदरच अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे शंका निर्माण झाली आहे. संस्थाचालकांच्या संगणमताने तर अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली गेली नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.
राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी 31 मार्च 2026 रोजी एक पत्र काढले, ज्यामध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षे दरम्यान पटपडताळणी करावी असे म्हटले तर दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी ही 11,15 आणि 22 एप्रिल रोजी करावी असे म्हटलं आहे.
तसेच नववीच्या विद्यार्थ्यांची पडताळणी ही 11 ते 22 एप्रिल दरम्यान तीन दिवसात करावी असे म्हटलं आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी परीक्षे दरम्यान झालेली आहे असे स्पष्ट केले आहे.

शिक्षण संचालक यांनी दिलेल्या तारखेनुसार पटपडताळणी झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. मात्र बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी 5 एप्रिल रोजी एक पत्र काढून तब्बल 125 अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे.
बीडच्या शिक्षण विभागातील अधिकारी हे काही ठराविक संस्थाचालक यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यामुळेच त्यांनी शिक्षण संचालक यांचे आदेश धाब्यावर बसवून अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली. ज्यामुळे त्या त्या शिक्षण संस्थाचालक यांचा फायदा होणार आहे. संस्थाचालक यांचे हित पाहणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतं आहे.
शिक्षण संचालक यांनी दिलेल्या तारखा पाहता पटपडताळणी साठी आणखी दहा बारा दिवस शिल्लक असताना बीडच्या शिक्षणाधिकारी यांनी कोणाच्या सांगण्यावरून ही यादी केली असा प्रश्न उपस्थित होतं आहे. पटपडताळणी झाल्याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचा आकडा समोर येऊ शकतं नाही, मग असे असताना शिक्षण संचालक यांचे आदेश धाब्यावर बसवून कोणाचे भले करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी ही यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली अशी चर्चा सुरु झाली आहे.

हे आहे शिक्षण संचालक यांचे पटपडताळणी करण्याबाबतचे पत्र.





Leave a Reply Cancel reply