News & View

ताज्या घडामोडी

images 35

खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा!

मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासापूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर त्याच्यासोबतचे छत्री धरलेला फोटोही समोर आला होता. त्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान  या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सीएमओ कार्यालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

रात्री उशिरा चाकणकर यांनी आपला राजीनामा दिला आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत सर्वात प्रथम चाकणकर यांच्यावर आरोप केले होते.

भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये IPS तेजस्विनी सातपुतें यांच्या अध्यक्षतेखाली SIT अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता याप्रकरणात सरकार कुणा कुणाला अटक करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version