News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!

बीड -जिल्हा परिषदेचा बांधकामं विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. कोणीही कोणतीही वर्क ऑर्डर काढायची, अधिकारी मॅनेज करायचे आणि कोट्यावधी रुपये उचलायचे. असाच एक प्रकार परळीत उघडकीस आला आहे. नेत्याच्या मागेपुढे करत त्यांची बीडला आल्यावर बडदास्त ठेवणाऱ्या सत्ताधारी पक्षातील बीडच्या एका मोठ्या कार्यकर्त्याने तब्बल एक कोटी रुपयांची बोगस कामे केली. यातील 86 लाख रुपयांची वसुली होणार असल्याने गुत्तेदारासह बीडचा तो मोठा कार्यकर्ता हैराण झाला आहे.

परळीतील मोहा या प्राथमिक आरोग्य केंद्राला कुरण बनवून अधिकारी आणि कंत्राटदारांनी तब्बल ८६ लाख ५७हजार ९३३ रूपयांचा निधी घश्यात घातला आहे. याप्रकरणी चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार याप्रकरणातील घोटाळेबाज तीन अधिकाऱ्यांसह दोषी घोटाळेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश सीईओ जितीन रहमान यांनी बांधकाम दोनच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक पत्रही काढले आहे. त्यामुळेच घोटाळेबाजांचे धाबे दणाणून गेले आहेत.


मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, आरोग्य केंद्राची दुरुस्ती यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या ठिकाणी केवळ बारा तेरा लाखात थातूर मातुर दुरुस्ती करून गुत्तेदारांनी 86 लाख रुपये घशात घातले. यामध्ये जिल्हा परिषद मधील शाखा अभियंता यांच्या मुलाच्या नावावर काही कामे करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. मुलाच्या नावावर कामे असल्याने या शाखा अभियंत्याने बोगस कामांना मंजुरी दिली.

मोहा येथे काम करण्यासाठी  शितल रामराव तांदळे , गजानम म.स.सं.म. काकहहिरा (ता. पाटोदा), शशिकांत चंद्रकांत सांगळे (रा. हिलर पाटला. केज), संत शिरोमणी भगवान बाबा म.स.ना.म. (घोगस पारयाव ता. शिरूर), अजय महादेव ढाकणे (रा. संभाजीनगर बीड), विशाल रविंद्र भेटूळे (दोन कामे रा. वरवंटी ता. बीड) आणि शिवशंकर गोरख मिदे (रा. चिखली ता. पाटोदा) या एजन्सी होत्या. त्यांनी कामात कसूर केल्याचा आणि बोगस काम करून बिल उचलल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.या कामात ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याबर आता कारवाई अटळ आहे. त्या अनुषंगानेच याप्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

ही सर्व कामे वेगवेगळ्या एजन्सीच्या नावावर घेतली असली तरी कामे घेणारा कार्यकर्ता हा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्याने त्याने हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी मोठी धावपळ केल्याची माहिती आहे. नेत्याला सांगून चौकशी थांबवणे किंवा कारवाई टाळण्यासाठी हा पदाधिकारी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

मंजूर कामात तब्बल ८६ लाख १७ हजार रुपयांची तफावत निघाली आहे. त्यामुळे ही रकम संबंधित कंत्राटदारांकडून वसूल केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी ब्लॅकलिस्टचीही कारवाई केली जाणार आहे.

झेडपी बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकांनाच कामे दिली आहेत. मोद्यातील या कामात अधिकाऱ्यांचा मोठा हात आहे, त्यामुळेच याचीही चौकसी करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही कामे झाली बोगस!
मोहा येथील प्रा.आ. केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, इमारतीमधील फर्निचर, वैद्यकिय अधिकारी निवास स्थान दुरुस्ती करणे, आरोग्य सेविका निवासस्थान दुरुस्ती करणे, लेडी हेल्थ व्हिजीटर निवास स्थान दुरुस्ती करणे, शवविच्छदेन गृह बांधकाम करणे, स्वच्छतासह दुरुस्ती व संपुर्ण नळ योजना करणे, परिसर उदयान सुशोभिकरण करणे, परिसरामध्ये वाहनशेड करणे, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान सिमेंट कॉक्रिट बंदिस्त नाली बांधकाम करणे, कार्टर सिमेंट कॉक्रिट बंदिस्त नाली यांधकाम करणे, कार्टर परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, सरंक्षण मित बांधकाम करणे, या कामात तब्बल ८६५७९३३ रूपयांची तफावत आढळून आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *