News & View

ताज्या घडामोडी

beed zilha bank 20171125434

जिल्हा बँकेची चौकशी कासवगतीने!

बीड – शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रशासकीय मंडळाने केलेल्या भ्रष्ट आणि गलथान कारभाराविरोधात लातूरच्या सहनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर बँकेची चौकशी करण्याचे आदेश छत्रपती संभाजी नगरच्या सहनिबंधकांना देण्यात आले. मात्र दोन महिने उलटून गेले तरी देखील चौकशी पूर्ण झालेली नसून बँकेतीलच काही झारीतील शुक्राचार्य या चौकशीमध्ये अडथळे निर्माण करत आहेत त्यामुळे चौकशी कासवगतीने सुरू असल्याची परिस्थिती आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार उघडकीस आला एमटीओ सारखी प्रकरणे असतील किंवा पुढार्‍यांच्या संस्थांना वाटप झालेले अव्वाच्या सव्वा कर्ज असेल यामुळे बँक बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. राज्य सरकारने या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करून संचालक मंडळ बरखास्त केले.

प्रशासक नियुक्त झाल्यानंतर बँकेचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा होती मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून बँकेतील एमडी मॅनेजर जनरल मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सावळा गोंधळ सुरूच ठेवला. यामध्ये बीडच्या तालुका निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी देखील हातभार लावत बँकेची वसुली असो किंवा थकीत कर्ज असो या प्रकरणात अक्षम्य असे दुर्लक्ष केले.

बँकेतील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन असो अथवा रजा रोखीकरण किंवा साहित्य खरेदी यामध्ये प्रशासकीय मंडळात बसलेले अधिकाऱ्यांना हाताशी धरून बँकेतील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. या सगळ्या प्रकरणाची तक्रार रामभाऊ खाडे यांनी सहनिबंधक लातूर यांच्याकडे केली होती.

या तक्रारीनुसार लातूर सहनिबंधक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लेखापरीक्षण विभागाचे सहनिबंधक यांना 10 ऑगस्ट रोजी या तक्रारीच्या अनुषंगाने 30 दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु बीडच्या तालुका उपनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काही अधिकारी जे बँकेच्या कारभारात नको तेवढे लक्ष देतात त्यांनी या चौकशीमध्ये अडथळे आणले असून चौकशी पूर्ण होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बँकेच्या प्रशासकीय मंडळाने जो काही कारभार करून ठेवला आहे त्याची चौकशी झाल्यास बँकेतील एमडी पासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांची पोलखोल होण्याची शक्यता आहे त्यामुळे चौकशीच मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *