संवर्ग चार च्या शिक्षकांचे हाल!
बीड- सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या शिक्षकांच्या बदल्या होत असताना सर्वात जास्त अन्याय जर कोणावर होत असेल तर तो संवर्ग चारच्या शिक्षकांवर. ज्या शिक्षकांना कोणीही वाली नाही असे सर्व शिक्षक मायबाप सरकारने संवर्ग चारच्या यादीत ढकलले आहेत. त्यात पुन्हा बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीन हजार संवर्ग चारच्या शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने बदलीची माहिती भरण्यासाठी सरकारने केवळ चारच दिवस दिले होते. यापूर्वी संवर्ग एक च्या व दोनच्या अशा सर्व मिळून जवळपास 1300 शिक्षकांना माहिती भरण्यासाठी प्रत्येकी चार दिवस देण्यात आले होते. निदान संवर्ग चारच्या शिक्षकांची संख्या पाहता त्यांना जास्त कालावधी देणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. यामुळे गुरुवारी तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी वेबसाईट ओपन केल्यानंतर जवळपास एक वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत बदली प्रक्रियेची वेबसाईट ही बंद होती. यामुळे हजारो शिक्षकांना आपली बदली प्रक्रियेची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरता आली नाही. अशा परिस्थितीत आता शासनाने संबंधित शिक्षकांना अजून किमान तीन ते चार दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिक्षण संघटनांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या 2016 सालापासून सुरू करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जे संवर्ग शासनाने तयार केलेले आहेत त्यामधील संवर्ग एकच्या तक्त्यामध्ये अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याचे मागील काही वर्षात निदर्शनास आले आहे.काही दिवसांपूर्वी शासनाने पत्र पाठवून प्रत्येक जिल्हा परिषदेकडून अँजिओप्लास्टी सारखी शस्त्रक्रिया दाखवून संवर्ग एक मध्ये स्थान मिळवणाऱ्या शिक्षकांची माहिती मागवलेली आहे. असे कित्येक बदली प्रक्रियेतील घोळ आजवर अनेकदा निदर्शनास आलेले आहेत. तरी देखील शासन या बदलीच्या धोरणात कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे पाहायला मिळते. निदान संवर्ग चारच्या शिक्षकांना ऑनलाइन माहिती भरण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आज शुक्रवार आठ ऑगस्ट हा संवर्ग चारच्या शिक्षकांसाठी माहिती भरण्यासाठी चा शेवटचा दिवस आहे त्यामुळे शासनाने त्वरित अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी आता होत आहे.





Leave a Reply Cancel reply