News & View

ताज्या घडामोडी

n5967918721712071168668c23f168783385a4cfef4ee2e57282a0b1adacdc993383a3f8dd5f29faa470c6e

बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेतली व तुमच्यावर गुन्हे दाखल असल्याने गुन्ह्यांची माहिती काढून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनकडुन प्रस्ताव मागवून तुम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येईल मात्र कारवाई होवू द्यायची नसेल तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराला पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले.

तक्रारदाराने 1 एप्रिल रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावून लाच पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी तडजोडीअंती दिड लाखांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व सोमवारी सायंकाळी दोंडाईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशी निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक शिंदे यांना अटक करण्यात आली.

Narendra Modi !पत्रकारांना टाळणारे मोदी मीडियाच्या स्टेजवर फुल फॉर्मात !#modi #modikaparivar #bjp
न्यूज अँड व्युजच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा !

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे सुमारे साठ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्कीटे व दागीने तसेच सुमारे 77 हजार रूपयांची चांदीची भांडी व दागीने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे 1 कोटी 75 हजार रूपयाच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version