News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250228 WA0032

दुष्काळ प्रश्नावर मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घ्या -धनंजय मुंडेंची मागणी!

मुंबई – बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 17 सप्टेंबर रोजी किंवा तत्सम कालावधीत लवकरात लवकर मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना व शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने तीव्र ताण दिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून खरीप हंगामात मराठवाड्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. यामुळे पेरलेली सर्व खरीप पिके करपून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

त्याचबरोबर विहिरी आणि तलावांतील जलस्रोत कोरडे पडल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करणार आहे, यावरही तातडीने उपाययोजना करणे व वेळीच योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच औचित्यावर किंवा तत्सम वेळेत लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन मराठवाड्यासाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशीही विनंती मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

मराठवाड्यातील संकटाच्या काळात नेहमीच राज्य सरकारने पुढाकार घेऊन मदत केलेली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आधीही अनेकदा मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यादृष्टीने मराठवाड्यात ही विशेष मंत्रिमंडळ बैठक आयोजित करून कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती देणे, खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई, रब्बी हंगामाचे नियोजन, तसेच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असेही श्री मुंडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाअभावी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह या भागांसाठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठका घेऊन तातडीने निर्णय घेण्यात यावेत, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी पत्रात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *