News & View

ताज्या घडामोडी

पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

विशेष संपादकीय/लक्ष्मीकांत रुईकर

पंकजा मुंडे यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला.हे करताना त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.त्यांना गेल्या चार वर्षात कशा पद्धतीने डावलले गेलं,कसा अन्याय झाला हे सांगितले ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं. पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही किंवा त्या कोणाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत नाहीत.2014  ते 2019 या काळात पत्रकार म्हणून त्यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते.त्या काळातही त्यांचा मीडिया बाबत एक वेगळा दृष्टिकोन होता.

मीडिया माझे मागे मागे फिरतो,मला बदनाम करण्यात किंवा नको त्या बातम्या करण्यात मीडियाला भारी हौस आहे.त्यामुळे त्यांना टीआरपी मिळतो मात्र मला त्याचा त्रास होतो,होपलेस आहे सगळं हे त्या अनेकवेळा बोलल्या आहेत.पण मीडिया मुद्दाम हे सगळं करतो का,तर नाही.काही लोक असतीलही पण सगळेच तसे नाहींत.

त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले,त्यावेळी किंवा त्यांची चप्पल बॉडीगार्ड ने उचलून त्यांच्या  पायात घातली त्यावेळी.अथवा मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना त्यांनी इंडस्ट्रीला विशेषतः दारू तयार करणाऱ्या कारखान्यांना पाणी मिळाले पाहिजे ही भूमिका घेतली त्यावेळी.किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या वेळी बीडमधील रेस्ट हाऊस वर जो ड्रामा झाला त्यावेळी, अथवा 2019 ला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळी त्या जे काही बोलल्या त्याच्याच बातम्या झाल्या.यात मीडियाचा काय दोष.

हा 16 मिनिटांचा व्हिडीओ नक्की पहा !

त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा विषय हा ज्यांनी कोणी मांडला तो कितपत खात्रीलायक होता हे त्यांना माहीत.पण एक गोष्ट नक्की आहे की जे पक्षाच्या वरिष्ठ मंडळींसमोर बोलायचं ते तुम्ही जाहीरपणे बोलतात अन त्याची बातमी होते.मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे हे तुमचं  स्टेटमेंट तुमच्या  राजकीय कारकिर्दीच्या ग्राफला खाली खेचण्यासाठी कारणीभूत ठरलं. त्यानंतर तुम्ही  अनेकवेळा याबाबत खुलासे केले.

तुमचा अन महाराष्ट्र भाजप मधील काही जेष्ठ नेत्यांचा असलेला विसंवाद लपून राहिलेला नाही.त्या नेत्यांनी याचा फायदा घेतला.प्रचंड क्षमता,लोकसंग्रह,मास लीडर असणाऱ्या पंकजा मुंडे या त्यांच्याच वक्तव्यामुळे अनेकवेळा अडचणीत आलेल्या आहेत.आता हे मी सांगतोय ते देखील तुम्हाला पटणार नाही.कारण  सल्ला दिलेला किंवा आरसा दाखवलेलं पटत नाही.तो तुमचा स्वभाव आहे,पण राजकीय मंडळी ज्यांच भविष्य उज्वल आहे त्यांना काही हिताच्या गोष्टी सांगितल्या शिवाय मलाही करमत नाही हा माझा स्वभाव आहे.

आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे ज्या भगवानगडावर स्व गोपीनाथ मुंडे यांची अपार श्रद्धा होती त्या गडाच्या महंत नामदेव शास्त्री यांच्याशी देखील तुम्ही  मंत्रिपदाच्या काळात पंगा घेतला.शास्त्री यांनी मुंडेंच्या निधनानंतर ज्या व्यसपीठावरून ते भाषण करायचे ते व्यासपीठ पाडून टाकले,तिथं सभा घ्यायचा हट्ट करायची गरज नव्हती.पण तुम्ही तो केला अन विनाकारण वाद ओढवून घेतला.

तीन चार महिन्यांपूर्वी तुम्ही याबाबत शास्त्रीच्या उपस्थितीत खुलेपणाने कबुली देखील दिली.मग हे जर तुम्हाला कळत तर का बोलता अस.नका ना बोलू.राजकारणात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात,मात्र त्यावर जाहीरपणे बोलून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा शांत राहून संयमाने परिस्थिती हाताळली गेली पाहिजे.

ही जी काही उदाहरणे मी दिली आहेत त्यापेक्षा अधिक किस्से लोकांमध्ये माहीत आहेत.मात्र त्यात जाण्याची गरज नाही.तुमचा स्वभाव हा तुमच्या प्रगतीत मोठा अडसर असतो हे मी सांगायची गरज नाही.मान्य आहे तुम्ही थेट बोलता, खोटेपणा,आत एक बाहेर एक,तोंडावर एक पाठीमागे दुसरं हे तुम्हाला जमत नाही किंवा आवडत नाही.पण खरं सांगायचं तर बीड जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर केंद्रशासित प्रदेश म्हटलं जातं.ते विनोदाने असेल,पण बीड जिल्हा भाजप मध्ये काहीही निर्णय घ्यायचा असेल तर प्रदेश आणि केंद्रीय पातळीवरील नेते दहावेळा विचार करतात अस बोललं जातं.ही तुमची दहशत आहे का? अन यात जर तुम्हाला मोठेपणा वाटत असेल तर ते चुकीचं आहे.तुम्हीच म्हणता ना राष्ट्र प्रथम,तद्नंतर पक्ष अन शेवटी व्यक्ती मग पक्षाला जो निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या.पण नाही तुम्ही नको ते नको तिथं बोलून बसता अन मग हातातोंडाशी आलेला घास दूर जातो.

चार वर्षात तुमच्यावर अन्याय झाला का तर हो नक्कीच झाला.तुमच्यात कुवत असताना तुम्हाला डावलले गेले का तर हो,तुम्हाला ज्युनियर असणाऱ्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा दिली गेली का तर हो,पण त्यामागे पक्षाच काही धोरण असेल हा विचार का नाही करत.आता तुम्ही म्हणाल मी कुठं नाराजी व्यक्त केली.तर तुम्ही जाहीरपणे हे सांगून काय केलं दुसरं.

तुमच्यातील नेतृत्व गुणाला पक्ष जर किंमत देत नसेल तर त्यात पक्षाच नुकसान आहे,बघतील ते,तुम्ही का टेन्शन घेताय.तुम्ही ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे तर जरूर जा पण ब्रेक के बाद स्वभावात बदल करा,तुम्ही केला नाहीये अस माझं मत नाहीये पण अजून थोडा बदला. आपल्या अपेक्षांना,स्वप्नांना काहिकाळासाठी मुरड घाला.याबाबत तुम्ही जुन्या काँग्रेसच्या नेत्यांचा आदर्श घ्या,ते अनेकवर्षं काम करत राहतात,पक्षाने सांगितलेले आदेश पाळतात ,पक्ष योग्यवेळी त्याना संधी देतो.अगदी बीड जिल्ह्याचच उदाहरण द्यायचे झाले तर माजीमंत्री अशोक पाटील आणि खा रजनी पाटील यांच देता येईल.जिल्हयात काँग्रेस मरणासन्न अवस्थेत असताना देखील पक्षाने रजनी पाटील यांना अनेकवेळा संधी दिली आहेच ना.

त्यापेक्षा तुम्ही अन तुमचा राजकीय प्रवास किंवा कारकीर्द खूप कमी आहे.राजकारणात ध्येय गाठायचं असेल तर विरोधकाला देखील हसून उत्तर द्यायला अन आपल्या सोबत असलेल्यांना जपायला हवं.आता हे एवढं सांगितले आहे ते तुम्हाला पटणार नाहीच याची खात्री आहे पण तरीही राहवलं नाही म्हणून हा उपद्व्याप केला.यावर तुमचे लाखो समर्थक सोशल मीडियावर माझ्या नावाने खडे फोडतील, नको नको ते लिहितील हे देखील मला माहित आहे पण माझाही स्वभाव तुमच्यासारखाच तोंडावर बोलण्याचा अन खर सांगण्याचा मग त्यात आपलं नुकसान झालं तरी हरकत नाही असा असल्याने हे सगळं केलं आहे,समजून घ्याल अन ब्रेक के बाद नव्याने सुरवात कराल हीच अपेक्षा.
धन्यवाद.
लक्ष्मीकांत रुईकर, बीड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *