मुंबई- थांबेल तो संक्या कसला अस म्हणत विक्रमविर अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचं कौतुक केलंय. नाट्यप्रयोग संपल्यावर मुंबईकडे जात असताना बस ड्रायव्हर ची तब्येत बिघडल्याने स्वतः संकर्षण ने गाडी चालवली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत दामले यांनी या आपल्या सहकारी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
नाटकाचा प्रयोग आटोपल्यानंतर कलाकार संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत दामले आणि इतर मंडळी परतीच्या प्रवासाला लागले. पण, या वाटेत त्यांच्यापुढे एक आव्हान वाट पाहत उभंच होतं. ही वेळच अशी होती, की परिस्थिती हाताळण्यासाठी खुद्द संकर्षण पुढे आला आणि त्यानं चक्क बस चालवली.
उत्तम दर्जाचा अभिनय करणारे आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. साधारण 25 सेकंदांच्या या व्हिडीओची सुरुवात रात्रीच्या अंधारातील रस्त्यापासून होते. जिथं कोणा एका माहामार्गावरून ते प्रवास करत असल्याचं लक्षात येत आहे. पुढे व्हिडीओ पाहिला असता चक्क अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच बसचं स्टेअरिंग हाती घेत ती चालवताना दिसत आहे. प्रथमक्षणी हे खरंही वाटत नाही, पण दामले यांनी प्रसंगाबाबतची लिहिलेली माहिती वाचून संकर्षणचं कौतुकच करावसं वाटतं.
संकर्षणनं बस चालवण्याची वेळ नेमकी का आली, याबाबत प्रशांत दामले लिहितात, ”काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबलं”
याच प्रसंगात इथं एंट्री झाली ती संकर्षणची. पुढे दामले लिहितात, ”पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन्स आहे हे कालच मला कळलं. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर….नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत.”
Leave a Reply