News & View

ताज्या घडामोडी

रेशनवर मिळणार ज्वारी अन बाजरी !

बीड- राज्यातील सात कोटी जनतेला गहू आणि तांदळासोबत आता ज्वारी आणि बाजरी देखील रेशन मार्फत वितरित केली जाणार आहे.तृणधान्याचे आहारात जास्तीतजास्त समायोजन व्हावे याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राज्यातील सात कोटी दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिले जातात. याऐवजी किंवा याबरोबरच ज्वारी आणि बाजरी शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे.

काही वर्षांपासून राज्यातील ज्वारी आणि बाजरीचे घटलेले उत्पादन वाढवण्यासाठी हा प्रयत्न फलदायी ठरेल, असा दावा या विभागातील एका अधिकार्‍याने केला आहे.तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठी घट होत आहे. 2010-11 ते 2021 या कालावधीत 57 टक्केे पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र घटले आहे. या कालावधीत उत्पादन 12 टक्क्यांनी घटले आहे. खरीप ज्वारी पिकाचे क्षेत्र 80 टक्केे, तर उत्पादन 87 टक्केे झाले; तर उत्पादकतेत 37 टक्केे घट झाली आहे.

रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र 53 टक्केे; तर उत्पादन 27 टक्केे घटले आहे. मात्र, उत्पादकतेमध्ये 55 टक्केे वाढ झाली आहे.बाजरी पिकाचे क्षेत्र 51 टक्केे, उत्पादन 59 टक्केे, तर उत्पादकता 17 टक्क्यांनी घटली आहे. नाचणी पिकाखालील क्षेत्र 39 टक्केे, उत्पादन 21 टक्केे घटले आहे; तथापि उत्पादकतेत 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उत्पादनवाढीसाठी तृणधान्य पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे ज्वारीसाठी 73 टक्केे, बाजरीसाठी 65 टक्केे आणि नाचणीसाठी 88 टक्केे इतकी हमीभावात वाढ करण्यात आली आहे.

ज्वारीसाठी 2017-18 मध्ये प्रतिक्विंटल 1,725 रुपये असलेला भाव आता 2,990 रुपये करण्यात आला आहे. बाजरीसाठी 1,425 वरून 2,350 रुपये आणि नाचणीसाठी 1,900 रुपयांवरून 3,578 रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव करण्यात आला आहे.

रेशनवर गहू आणि तांदूळ सोबत ज्वारी आणि बाजरी दिल्यामुळे उत्पादन वाढ होईल आणि जनतेला पौष्टिक अन्न खायला मिळेल अशी सरकारची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *