News & View

ताज्या घडामोडी

सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!

नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे.

ब्रिटिशांच्या वतीने लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित नेहरुंच्याकडे एक राजदंड दिला आणि सत्तेचं हस्तांतर झालं. आता हाच राजदंड ज्याला सेंगोल (Sengol) असं म्हटलं जातंय, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुन्हा एकदा नव्या संसदेत बसवण्यात येणार आहे.

सन 1947 साली तामिळनाडूंच्या राजराजेश्वर मंदिरात लगबग होती. इथल्या काही लोकांवर एक विशेष जबाबदारी होती. देशात स्वातंत्र्याचा सुर्योदय होणार होता, इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन देश मोकळा श्वास घेणार होता, अनेक दशकांच्या स्वातंत्र्यलढ्याला यश मिळणार होतं. दिल्लीत संसदेत हालचालींना वेग आला होता आणि इकडे तामिळनाडूतून काही जण दिल्लीला रवाना झाले. पण त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आणि ती घेऊनच ते देशाच्या राजधानीकडे रवाना झाले.

दिल्लीत सत्तेचं हस्तांतर होणार होतं. त्यासाठी देशाचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शन देशात सत्तेचं हस्तांतर होणार होतं. मात्र ही प्रक्रिया नेमकी करायची कशी असा प्रश्न माऊंटबॅटन यांच्यासमोर होता. फक्त हस्तांदोलन करुन ही प्रक्रिया करावी की त्यासाठी काही तरी प्रतिकात्मक प्रक्रिया असावी अशी चर्चा सुरु झाली.

लॉर्ड माऊंटबॅटन यांनी त्यावर पंडित जवाहरलाल नेहरुंशी चर्चा केली आणि त्याच्यासमोरची समस्या सांगितली. नेहरुंनाही त्यांचं म्हणणं पटलं. इतक्या मोठ्या प्रसंगावेळी तितकाच मोठा संदेश जाईल, तितकंच मोठं प्रतिक असावं असंच नेहरुंनाही वाटलं.

हे कोडं सोडवण्यासाठी नेहरुंनी तेव्हाचे ज्येष्ठ नेते सी राजगोपालचारी यांची भेट घेतली. त्यांना आपल्यासमोरचं कोडं सांगितलं. राजगोपालचारींचा भारतीय इतिहास, संस्कृतीवर प्रंचड अभ्यास होता. मूळच्या तामिळनाडूच्या असलेल्या राजगोपालचारींनी नेहरुंच्या कोड्यांचं उत्तर शोधलं ते चोल साम्राज्याच्या इतिहासातून.

चोल साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं साम्राज्य होतं. नवव्या शतकात चोल साम्राज्याचा उदय झाला. पुढे तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य आता अस्तित्वात असलेल्या 11 देशांमध्ये पोहोचलं होतं. दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापूर आणि मालदीव इतक्या सगळ्या देशांमध्ये चोल साम्राज्याची पताका फडकत होती. अर्थात तेव्हा यातल्या अनेक देशांची नाव वेगळी होती. इथं चार शतकांपेक्षा जास्त काळ चोल साम्राज्याचीच सत्ता होती आणि याच चोल साम्राज्याच्या इतिहासातून राजगोपालचारींनी नेहरुंच्या प्रश्नाचं उत्तर शोधलं.

दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्यात नव्या राजाची निवड होत असताना, पदावरुन दूर जाणारा राजा आपल्या हाताने सेंगोल म्हणजेच राजदंड पुढच्या राजाच्या हातात देतो आणि अशाच पद्धतीनं चोल साम्राज्यात शतकानुशतकं सत्तेचं हस्तांतर होत होतं.

‘सेंगोल’ हा शब्द तामिळ शब्द ‘सेम्माई’ वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा आहे. तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठातील मुख्य मठाधीपती यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं जातं. न्यायाचा रक्षक म्हणून त्यावर हाताने कोरलेला नंदी बसवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल धारण करणार्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्याने विसरू नये असे निर्देश असतात.

सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा होती आणि त्याचं सेंगोलच्या हस्तांतरानं चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतर व्हायचंय. हीच संकल्पना सी राजगोपालचारींनी पंडित नेहरुंना सांगितली. इतकंच नाही तर सत्तेचं हस्तांतर होत असताना यापेक्षा चांगलं प्रतिक मिळणार नाही असंही पटवून दिलं.

सी राजगोपाल यांनी सांगितलेली संकल्पना पंडित नेहरुंनाही आवडली आणि त्यांनी होकार दिला. त्यावेळी राजगोपालचारींनी एक समिती स्थापन केली. त्यामध्ये दक्षिणेतील काही महंताचा समावेश केला. राजगोपालचारींनी तामिळनाडूंच्या महंतांना आपला हेतू सांगितला. तेव्हाच्या मठाधीशांनीही राजगोपालचारींच्या विनंती होकार केला आणि 1947 साली वुम्मिदी बंगारु ज्वैलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती केली. या राजदंडावर नंदीची मूर्तीही स्थापित केली.

हाच राजदंड पुढे दिल्लीत पोहोचला आणि त्याची विधिवत पूजा करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी हाच राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हातात दिला. अशा प्रकारे देशातल्या ब्रिटिश सत्तेचे हस्तांतर भारतीयांकडे झालं

हाच राजदंड स्वीकारल्यानंतर पंडित नेहरुंनी रात्री 12 वाजता ऐतिहासिक भाषण केलं. आता हाच राजदंड पुन्हा एकदा 75 वर्षांनी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *