News & View

ताज्या घडामोडी

राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा !

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी मी कोणत्याही दुसऱ्या पक्षाचा प्रमुख होणार नाही,कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे असे आदेशही ठाकरे यांनी दिले.

मनसे चा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला.त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की,मी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांशी आणि एकनाथ शिंदेशी बोललो. त्यांना सांगितले की, मला या वाटाघाटीत पाडू नका. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नकोय. या देशाला पुढे नेण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच, मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देशही दिले. राज ठाकरे म्हणाले, सर्व मनसैनिकांना एकच सांगतो. आगामी विधानसभेच्या कामाला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला जे मांडायचे असेल, ते मांडेल.


माझ्यावर अनेकजण टीका करतात की, 2019 च्या निवढणुकीत मी भाजपचा विरोध केला होता. पण, मी जे योग्य त्याला योग्य बोललो, जे अयोग्य त्याला अयोग्यच बोललो. 2014 च्या निवडणुकीनंतर मला वाटले की, मी जो विचार करत होतो, तसा पाच वर्षात काहीच झाला नाही. मी आजही सांगतो, ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या नाहीच. ज्या चांगल्या वाटल्या, त्याला चांगलं बोलणार आणि ज्या चांगल्या वाटल्या नाही, त्याला विरोध करणार. मी जेवढे टोकाचे प्रेम करतो, तेवढाच टोकाचा विरोधही करतो.

होय 2019 साली मी टोकाचा विरोध केला. पण, पुढे कलम 370, सीएए, एनआरसीसारखे चांगले निर्णय सरकारने घेतले. गेल्या पाच वर्षात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या, त्याचे मी पहिल्यांदा स्वागत केले आहे. ज्या गोष्ट योग्य, त्या योग्य अन् ज्या अयोग्य त्या अयोग्यच. आता माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकच अपेक्षा आहे. आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वात तरुण देश आहे. देशातील तरुणांमध्ये खुप काही करण्याची ताकद आहे. आजच्या तरुणांना चांगले शिक्षण, तंत्रज्ञान, नोकरींची गरज आहे. पुढील दहा वर्षात हा देश पुन्हा वयस्कर होईल. या देशातील तरुणांकडे लक्ष दया, एवढीच मी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा ठेवतो, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *