News & View

ताज्या घडामोडी

कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीचा जेलमध्ये मृत्यू !

उत्तरप्रदेश- कुख्यात डॉन मुख्तार अन्सारी याचा जेलमध्ये हृदयविकार च्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे. अन्सारी याच्यावर 65 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते.उत्तरप्रदेश मधील जेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून तो होता.पहाटे त्याला हृदयविकार चा झटका आला,बांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बांदा मेडिकल कॉलेजकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं, ज्यात मुख्तार अन्सारीचा मृत्यू कार्डियक अरेस्टने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्तार अन्सारीवर 65 पेक्षा जास्त केस दाखल होत्या. यात 21 डिसेंबर 2022 ला पहिल्यांदा त्याला शिक्षा झाली होती. दोन केसमध्ये मुख्तार अन्सारीला जन्मठेप झाली. 17 महिन्यांमध्ये त्याला 8 वेळा शिक्षा झाली.

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मऊ, गाजीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांदा मेडिकल कॉलेजबाहेर मोठ्या प्रमाणावर पॅरा मिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. तसंच डीजीपी मुख्यालयाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

माफिया मुख्तार अन्सारीचं कुटुंब बांद्याला जाण्यासाठी रवाना झालं आहे. तसंच हायकोर्टात मुख्तार अन्सारीची केस लढणारे वकील अजय श्रीवास्तवही बांद्यामध्ये येणार आहेत. मुख्तारचं गाव असलेल्या मुहम्मदाबादमध्ये लोकं जमा व्हायला सुरू झाली आहेत. मुख्तारच्या घराच्या आसपास पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गाजीपूर, मऊ, आजमगड पोलीसही हायअलर्टवर आहेत. तसंच पोलिसाांनी सोशल मीडियावर अफवा, भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुख्तारच्या मृत्यूनंतर मऊ, बांदा आणि गाजीपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

मुख्तार ची गुन्हेगारी पार्श्वभूमी !

मुख्तारची टोळी 14 ऑक्टोबर 1997 रोजी गाजीपूरमध्ये नोंदवण्यात आली होती. 29 नोव्हेंबर 2005 रोजी भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुख्तार अन्सारी टोळी आणि त्याच्या साथीदारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आणि त्यांचे उत्पन्नाचे स्रोतही बंद केले. या टोळीतील 292 साथीदारांचा शोध लागला असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 160 गुन्हे दाखल आहेत.

टोळीकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 175 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. टोळीच्या 164 सदस्यांवर गँगस्टर कायद्यांतर्गत आणि सहा जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ज्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत अशा टोळीशी संबंधित चोरट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. टोळीतील पाच गुन्हेगार वेगवेगळ्या ठिकाणी चकमकीत ठार झाले. गुन्ह्यातून मिळवलेल्या मालमत्तेवरही पोलिसांनी सक्त कारवाई केली.

आतापर्यंत मुख्तार आणि त्याच्या टोळीची ६०५ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि ती नष्ट करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 318 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तर 287 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जमीनदोस्त करून अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यात आली आहे. या टोळीचा 215 कोटींचा अवैध धंदा पोलिसांनी रोखला आहे. या टोळीला मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पोलिस त्याच्या मालमत्तेची माहितीही गोळा करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *