News & View

ताज्या घडामोडी

युवराज,जहिरने जिंकली परळीकरांची मने !

परळी  – भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराजसिंग आणि जहिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत परळीत नाथ प्रतिष्ठानच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. पुढील वर्षी परळीत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मानस कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली आहेत. क्रिकेट सह क्रीडा क्षेत्रातही परळीचे मोठे योगदान आहे. रणजी ट्रॉफीसाठी मराठवाड्याची स्वतंत्र टीम असली असती, तर परळी सह बीड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना त्याद्वारे आपली प्रतिभा राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली असती; ती संधी मिळावी म्हणून दरवर्षी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण क्रिकेट व अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो. याही वर्षी आपण वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील या मैदानावर नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले, परंतु पुढील वर्षी ही स्पर्धा स्वतंत्र भव्य स्टेडियम मध्ये होईल; यासाठी राज्य शासनाने सुमारे 65 कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले असून परळीत येत्या काही महिन्यातच सुसज्ज असे क्रीडा संकुल उभे केले जाईल. त्यामध्ये क्रिकेटसह अन्य क्रीडा प्रकारातील खेळांनाही सुसज्ज असे मैदान उभे करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे बोलताना केली.

ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे मागील 25 जानेवारीपासून भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परळी शहर तसेच मतदार संघातील ग्रामीण भागातील 264 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा अंतिम सामना आज हजारो क्रिकेट प्रेमींच्या उत्साहात खेळवला गेला व त्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात धनंजय मुंडे बोलत होते. या समारंभास खास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंग तसेच बॉलिंग ची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला स्टार गोलंदाज जहीर खान यांची विशेष उपस्थिती होती. दोघांचेही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक तरुणांनी एकच जल्लोष करत आपल्या लाडक्या खेळाडूंचे जोरदार स्वागत केले.

आपल्या शरीरात वाढत असलेल्या कॅन्सरवर मात करून युवराज सिंग ने देशासाठी अनेक रेकॉर्ड स्थापित केले युवराज सिंग आज प्रथमच परळीत आले असता वैद्यनाथ असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या चरणी युवराज सिंग यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करत असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

मी देखील ग्रामीण भागातून टेनिस बॉल पासून क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली. हळूहळू संधी उपलब्ध होत गेली आणि देशासाठी खेळायची मला संधी मिळाली. ग्रामीण भागाच्या मातीतूनच योग्य वेळी योग्य संधी मिळाल्याने मोठे खेळाडू निर्माण होत असतात. त्यामुळे माझे मित्र धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी स्थानिक प्रतिभावान खेळाडूंना योग्य मंच उपलब्ध करून दिल्यानेच ग्रामीण मातीतून युवराज सिंग आणि झहीर खान सारखे खेळाडू घडत असतात असे गौरव उद्गार भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी काढले.

मी अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर मधून टेनिस बॉल पासूनच सुरुवात केली आणि पुढे खेळत गेलो. आज परळीत येऊन ग्रामीण भागात क्रिकेटचे एवढे भव्य आयोजन पाहून मला अतिशय आनंद झाला. परळीत खेळले जाणारे हे क्रिकेट एक दिवस देशात आणि देशाबाहेर नक्कीच पोहोचेल, असा मला विश्वास आहे, असे मत यावेळी भूतपूर्व भारतीय क्रिकेटर जहीर खान यांनी व्यक्त केले.

या समारंभात प्लेअर ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बॅटिंग, बोलींग, अंपायर आदी सर्वांचाच सन्मान करण्यात आला. आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभय मुंडे, व्यंकटेश मुंडे, सुशील कराड, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, प्रणव परळीकर, अविनाश गवळी, प्रा. अजय जोशी, शेख मुसा, सय्यद मुस्तफा, उमेश नागरगोजे, बालाजी वाघ, विष्णू गीते, सुरेश गीते, बिलाल हुसेन, हाजी बाबा यांसह आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *