News & View

ताज्या घडामोडी

पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना नोटीस !

बीड- लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील वेळेत न देणाऱ्या अन खर्चाच्या तपशिलात तफावत आढळून आल्याने भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.

नोंदवही लेखांची प्रथम तपासणी न करणाऱ्या उमेदवारांमध्ये करुणा धनंजय मुंडे, शेषेराव चोकोबा वीर, गोकुळ बापूराव सवासे, प्रकाश भगवान सोळंके, राजेंद्र अच्युतराव होके, शेख तौसिफ अब्दुल सत्तार, शेख एजाज शेख उमर यांची नावे आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रथम खर्चाची नोंदवही शनिवार दिनांक 04 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05 या कालावधीत खर्च सनियंत्रण कक्ष 39 बीड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय विज्ञान केंद्र (NIC) कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून अथवा प्रतिनिधी उपस्थित राहून नोंदवही तपासणी करून घेणे बंधनकारक होते. जे उमेदवार अभिलेखाचे तपासणी करण्यास आलेले नाहीत अशा उमेदवारांना लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 77 अन्वये निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवण्यात कसुर केल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा 07 उमेदवारास नोटीस पाठविण्यात आले असून या उमेदवारांनी स्वतः अथवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत 48 तासात निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा भारतीय दंड संहितेचे कलम 171 ‘झ’ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे नोटीस जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बजावले आहे.


भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे, यांना आणि नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोन उमेदवारांना तपासणीसाठी सादर केलेल्या निवडणूक खर्चातील तफावती बाबत नोटीस जारी करण्यात आलेले आहे.

पंकजा मुंडे यांनी दिनांक 24 एप्रिल ते 2 मे 2024 पर्यंत सादर केलेल्या एकूण खर्चाची रक्कम दोन लाख 73 हजार 38,(273038) एवढी सादर केली आहे. खर्च निरीक्षक कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण खर्च रक्कम 8 लाख 68 हजार 101 (868101) एवढी आहे. यामध्ये छायांकित नोंदवहीनुसार झालेल्या खर्चाचा विचार करता उमेदवाराकडून 05 लाख 95 हजार 63 त्यांच्या लेख्यात कमी दर्शविलेली आहे.
बजरंग सोनवणे यांनी 22 एप्रिल ते 02 मे 2024 पर्यंत सादर केलेल्या एकूण खर्चाची रक्कम 03 लाख 53 हजार 165 आहे. तर कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण खर्चाची रक्कम 08 लाख 84 हजार 459 आहे. छायांकित नोंदवहीनुसार झालेल्या खर्चाच्या विचार करता उमेदवाराकडून 05 लाख 31 हजार 294 रक्कम त्यांच्या लेखात कमी दर्शविली आहे.


लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 77 प्रमाणे निवडणूक कालावधीत प्रत्येक उमेदवार स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधी द्वारे निश्चित तारखेस नामनिर्देशित झालेल्या व त्याचा निकाल जाहीर झाल्याची तारीख दोन्ही तारखांसह या दरम्यान त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या संबंधातील सर्व खर्चाचे स्वतंत्र व अचूक लेखी ठेवतील अशी तरतूद आहे. या दोन उमेदवारांचे सदर तरतुदीचे पालन न केल्यामुळे त्यांना नोटीस दिले असुन 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्यात लावलेला आहे अन्यथा लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 77 अनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *