News & View

ताज्या घडामोडी

राज्याच्या राजकारणात काहीतरी घडतंय !शहा,शिंदे,फडणवीस यांची गुप्त बैठक !!

मुंबई- राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे कायम राहतील असंही बोललं जातंय,या अशा वातावरणात देशाचे गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी आ पराग आळवणी यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल एक तास गुप्त बैठक घेतली. त्यामुळे राज्यात नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही.

अमित शहा हे रविवारी मुंबई दौर्‍यावर आले होते. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील केशवराव घैसास सभागृहात हजर राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभराव्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकले. यानंतर आ. अळवणी यांच्या निवासस्थानी अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाली. राज्यात सध्या अस्थिर राजकीय वातावरण आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा देखील सुरू आहेत. मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हे कायम राहतील आणि 2024 च्या निवडणुका या त्यांच्याच नेतृत्वाखालीच लढण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. या चर्चेत शहा यांनी शिंदे-फडणवीस यांना अधिक समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्याचे समजते

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा जोर धरत आहेत.कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलला जाईल अशीही चर्चा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे 15 ते 20 मे च्या दरम्यान मुख्यमंत्री होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक मंत्री बदल होणार नाही अस सांगत असताना भाजपमध्ये मात्र बदलाची चर्चा जोर धरत आहे.अशा परिस्थितीत गृहमंत्री अमित शहा हे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा मुंबईत आल्याने नेमकं काय चाललंय ही चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *