News & View

ताज्या घडामोडी

बीड नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर !

बीड- बीड नगर परिषदेत प्रशासकीय राज असल्याने अधिकारी मनमानी करत आहेत.बोगस कामे दाखवून शासकीय पैशाचा अपव्यय केला जात आहे.वडवणी नगर पंचायत मध्ये ज्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे,त्या आधारावर बीड नगर परिषद च्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याचे उघड झाले आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी केली आहे.

नगरपरिषदेच्या अंतर्गत होणार असलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेचा मोठा गोंधळ समोर आला आहे. बीड नगर परिषदेच्या कामाला चक्क वडवणी नगरपंचायतला दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या आधारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भाने अशाप्रकारचे अनेक प्रकार झाले असल्याची शक्यता असून याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी केली आहे.


बीड नगर परिषदेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत प्रभाग क्रमांक २२ मध्ये घाने काकू ते वंदना नवनाथ वाघमारे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे. या अंदाजीत २० लाख रूपयांच्या कामाला दि.१५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील तांत्रिक मान्यता क्रमांक ७६२ च्या आधारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु ७६२ क्रमांकाची तांत्रिक मान्यता दि.५ जानेवारी २०२४ रोजी वडवणी नगरपंचायतीच्या एका कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून अगोदरच देण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. बीड नगरपरिषद व सह-आयुक्त नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून कुठलीही खातरजमा न करता, दुसर्‍या कामाच्या तांत्रिक मान्यतेच्या आधारे प्रशासकीय मान्यता काढणे अत्यंत गंभीर चुकीचा प्रकार आहे. अशाप्रकारे अनेक कामांच्या बाबतीत गोंधळ झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात अशी मागणी आ.क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी केली आहे. याबाबत मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नगर परिषद प्रशासन आयुक्त तथा संचालक, संभाजी नगरचे विभागीय आयुक्त, बीडचे जिल्हाधिकारी नगरपरिषद प्रशासन जिल्हा सह-आयुक्त व बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आ.क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार केला असून नियमांच्या अधीन राहून कायद्यानेच कामे करण्यात यावीत अशी मागणी केली आहे. दरम्यान मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी अनेक कामे दुबार असण्याची व कामांमध्ये अनियमितता असण्याचा संशय व्यक्त केला होता.


बीड नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगरोत्थान, दलितेत्तर योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेतंर्गत नोव्हेंबर २०२३, डिसेंबर २०२३ व जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेतलेली आहे. परंतु सध्याच्या झालेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने, सदरील योजनांसाठी मागिल तारखेत कोणत्याही कामास तांत्रिक मान्यता देऊ नये अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *