News & View

ताज्या घडामोडी

कोविड काळात कपड्याच्या व्यापाऱ्याला कोट्यवधींची कामे !मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा !!

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्यावर अक्षरशः शरसंधान केले.कोविड च्या काळात एका कपड्याच्या व्यापाऱ्याला कशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.आम्हाला खोके सरकार म्हणणाऱ्यानी आपली घर कशी भरली हे त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडले.

आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंनी रोमिंग छेडाला दिलेल्या कंत्राटांची यादीच वाचली.

राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणात जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडिक उठल्याशिवाय राहाणार नाही.

कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे.

आदित्यराजाच्या कृपाकिरणात न्हाऊन निघाल्यानंतर वरुणराजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पाडला. उत्तर प्रदेशातील हायवे कंस्ट्रक्शन्स नावाची एक कंपनी आदित्यच्या तेजाने अशी काही तळपली की, स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामांत प्रचंड चमकली.

मी रोमिंग म्हणालो, कारण या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं रोमिन छेडा आहे..
या कंपनीच्या सुरसकथांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून.हायवे, ब्रीज बनवणाऱ्या या कंपनीला आदित्यकृपेने चक्क पेंग्विनसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं.या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं… इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू होतो.

पुढील चार वर्षांत या रोमिनला छोटी-मोठी मिळून सुमारे २७० कोटी रुपयांची तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली. त्यावर नंतर मी बोलतोच; पण हायवे बनवणाऱ्या या कंपनीला फ्रंट ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोव्हिडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट बहाल करण्यात आलं.

बरं हा रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल, अशी कोणाची समजूत होईल पण, गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं.हायवे कंपनीला कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून उर्वरीत सर्व पैसे या रोमिन छेडाच्या खात्यांमध्ये फिरवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळला? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा.

आता ऑक्सिजन प्लॅन्टकडे वळूया, ६० कोटींचं काम जुलै महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं; मात्र सदर काम एक महिना उशीरा, म्हणजेच ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्याचे दाखवून त्या करीता केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला.

ऑक्टोबर महिना धरला तर तीन महिन्यांकरीता नऊ कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला. पण गोष्ट इकडे संपत नाही, ऑगस्टमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचे दाखविले.

कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचे ८० कोटींचे काम बहाल करण्यात आले. त्यामुळेच ऑगस्टमध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखविण्याचा आटापिटा करण्यात आला.

ऑक्सिजन प्लॅन्टच्या अगोदरच्या सुरस कथा तर अंचबित करणाऱ्या आहेत. रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एग्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू, ५ डी थिएटर, प्रशासकीय कार्यालये, लांडगे, कोल्हे, स्लॉथ बेअर, ऑटर, मद्रास पाँड टर्टल, तरस, बिबट्या एग्झिबिशन सेंटर, पक्ष्यांचे पिंजरे, रेप्टाइल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली.

या बरोबरच पेंग्विन कक्षाकरीता निगा व देखभालीचे कंत्राट देखील बहाल करण्यात आले, ज्यामध्ये एचव्हीएसी सिस्टिम, इलेक्ट्रिकल सिस्टीम, लाईफ सपोर्ट सिस्टिम, व्हेटरनरी डॉक्टर आणि पेग्विंनकरीता मासे पुरविण्याचे कंत्राटही देण्यात आले, आता काय बोलायचे यावर…

हे कमी की काय म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरींग सेवांचेही निगा-देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आले, अनेक वेळा हे काम एक-एक महिन्याच्या कालखंडाचे दाखवून सातत्याने सलग देण्यात आले. यात काय गौडबंगाल होते, देव जाणे.

याच महान कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरीफायर पुरविण्याचे कामही देण्यात आले.पक्षी कक्ष आणि टर्टल पाँडसाठी अंडर वॉटर लाइट्स, फिल्टर पंप्स पुरविण्याचेही काम देण्यात आले,

झू हॉस्पिटलमध्ये हाऊस कीपिंगचेही काम देण्यात आले, पक्षी कक्षात एनरिचमेंट डिवाईसेस पुरविण्याबरोबरच नॅनो कॉपर कोटिंग असलेल्या व्होल्फशिल्ड पुरविण्याचे काम देण्यात आले, हे कमी की काय, त्यांना झू पाठोपाठ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्येही ही व्होल्फशील्ड पुरविण्याचे काम देण्यात आले.

याउपर त्यांना महापालिकेच्या विविध हॉस्पिटलमधील एसी युनिटच्या देखभालीचे काम देण्यात आले. ही कंपनी काय काय करते, याची जंत्री प्रचंडच आहे. थोड्याच गोष्टी वाचून आपले डोक गरगरायला लागते.आता पुन्हा ऑक्सिजनकडे वळूया, कपड्याचे दुकान असणाऱ्या रोमिन छेडाने गंजलेला ऑक्सिजन प्लॅन्ट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा प्रादूर्भाव झाला, काही जणांचे डोळे गेले तर काहीजण जीवानिशी गेले. ज्याचे यांना काही सोयरसुतक नाही. यांचा मतलब पैशांशी.

जिथे टेंडर तिथे सरेंडर ही यांची वृत्ती आहे. यांच्याकडे पैशाचा वरुणराज बरसत असताना सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपला आणि कुटुंबाचा जीव वाचविण्याची केविलवाणी धडपड करीत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी… बाकी जनतेने फिरावं दारोदारी.. ही यांची वृत्ती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *