News & View

ताज्या घडामोडी

जाळपोळ,दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार !स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांच्या तपासावर संशय !!

बीड- बीड शहरासह जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी 250 पेक्षा अधिक आरोपीना अटक केली असली तरी अद्यापही गोरख शिंदे सारख्या म्होरक्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.स्थानिक गुन्हे शाखेवर मोठी जबाबदारी असताना त्यांची दोन पथके अन पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा कारभार म्हणजे मला पहा अन फुल वहा असा झाला आहे.त्यामुळे पोलीस शिंदेसह इतर आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर 2023 रोजी माजलगाव, बीड येथे राजकीय नेत्यांची कार्यालये आणि घरांवर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.या प्रकरणात पोलिसांनी पाच हजार पेक्षा अधिक आरोपींवर गुन्हे दाखल केले.

मात्र यामधील मुख्य आरोपी हे राजकीय पक्षाशी निगडित असल्याने अद्याप त्यांना अटक झालेली नाही.पोलिसांनी आतापर्यंत बीडच्या प्रकरणात 254 आरोपी अटक केले आहेत,ज्यामध्ये 17 आरोपी हे अल्पवयीन आहेत.अटक केलेल्या आरोपीमध्ये अनेक जण राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.

पोलीस अटक केलेल्या आरोपींचा आकडा रोज जाहीर करत आहेत.मात्र यात जे जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अद्याप अटक झालेली नाही.बीडच्या प्रकरणातील गोरख उर्फ पपु रामप्रसाद शिंदे रा केसापुरी परभणी,हल्ली मुक्काम राधागोविंद नगर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पोलीस दलात सगळ्यात पॉवरफुल नेटवर्क हे स्थानिक गुन्हे शाखेचे असते मात्र बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे या प्रकरणात नेटवर्क कमी पडत असल्याचे चित्र आहे.या शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे,सपोनि सुतळे आणि तुपे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके नियुक्त केलेली आहेत.पण त्यांनाही शिंदेला पकडण्यात यश आलेले नाही.

विशेष बाब म्हणजे या सगळ्या तपासात पोलीस अधीक्षक यांचा मोठा विश्वास हा स्थानिक गुन्हे शाखेवर आहे पण त्यांना अपेक्षित अशी कामगिरी करण्यात यश येत नसल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *