News & View

ताज्या घडामोडी

पतसंस्थेच्या पैशातून उभारलेला गूळ कारखाना अडचणीत ! शेतकरी हवालदिल !

बीड- मुनीम,पिग्मी एजंट ते पतसंस्थेचा अन गूळ कारखान्याचा मालक हा साईनाथ परभने यांचा प्रवास थक्क करणारा आहे.ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशातून त्यांनी हिरापूर आणि गुळज या ठिकाणी गूळ कारखाने काढले मात्र त्या धंद्यात तोटा आल्याने पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या झोपेत धोंडा घालण्याचे काम त्यांचाकडुन झाले आहे.जो माणूस ठेवीदारांचे पैसे वेळेत देऊ शकत नाही तो आपल्या उसाचे पेमेंट वेळेवर देईल की नाही या शंकेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

बीड येथील साईराम अर्बन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्वच शाखा दोन दिवसापासून बंद झाल्याने ठेवीदारांनी एकच गर्दी केली.परभने यांना नेमकी काय अडचण आली याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

एक साधा मुनीम ,बँकेत पिग्मी एजंट इथपासून अवघ्या पाच सात वर्षात त्यांनी साईराम च्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले .मात्र हा पैसा ठेवीदारांचा आहे याचा विसर त्यांना पडला.ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेला पैसा त्यांनी गूळ उद्योग, स्टील उद्योग आणि जमिनीत व प्लॉटिंग मध्ये गुंतवला.

हिरापूर आणि गुळज या ठिकाणी जवळपास पन्नास ते शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. हा सगळा पैसा कुठून आला हा संशोधनाचा विषय आहे. मात्र गतवर्षी या धंद्यात तोटा सहन करावा लागला. तो भरून काढण्यासाठी पुन्हा ठेवींचा वापर केला गेला.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी सुरू केली अन शिल्लक रक्कम पुरेशी नसल्याने सर्वच शाखा एकाच वेळी बंद झाल्या.आज परभने कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही.मात्र त्यांनी पतसंस्था बंद केल्याने आता यावर्षी गूळ कारखान्याला ऊस घालायचा की नाही,जे परभने ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाहीत ते आपले पैसे देणार की नाही या चिंतेने शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *