News & View

ताज्या घडामोडी

बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर !

बीड- राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे,यात बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे.संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असताना केवळ तीनच तालुक्यांचा समावेश झाल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.

ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा निकष लागू झाला. त्याचप्रमाणे पीक निर्देशांक व जमिनीतील आर्द्रतेचा निर्देशांक या निकषांचा आधार घेत राज्यातील १५ तालुक्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा यासाठी कृषी आयुक्तांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतरच्या पडताळणीनंतर कृषी आयुक्तालयाने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली. त्यानुसार सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलातील सूट, पीक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी टँकरचा वापर तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडित न करणे अशा सवलती लागू करण्याची मान्यता दिली आहे. विविध सवलतींपोटी आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेशही या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.

याप्रकरणी पुढील कार्यवाही करून त्याचा अहवाल विभागात सादर करण्यात यावा. दुष्काळ घोषित केल्याचे आदेश शासन निर्णयाच्या दिनांकापासून अंमलात येतील व हे आदेश राज्य सरकारने रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील, असेही त्यात नमूद केले आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे व त्यांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणाव्यात, असेही नमूद केले आहे. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा समावेश आहे.

गंभीर दुष्काळाची तालुके :

नंदुरबार – नंदुरबार

जळगाव – चाळीसगाव

जालना – अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर, सोयगाव

नाशिक – मालेगाव, सिन्नर, येवला

पुणे – पुरंदर, बारामती

बीड – अंबाजोगाई, धारूर, वडवणी

लातूर – रेणापूर

धाराशिव – लोहारा, धाराशिव, वाशी

सोलापूर – बार्शी, माळशिरस, सांगोला

मध्यम दुष्काळी तालुके

धुळे – शिंदखेडा

बुलढाणा – लोणार, बुलढाणा

पुणे : दौंड, इंदापूर, शिरूर

सोलापूर : करमाळा, माढा

सातारा – वाई, खंडाळा

कोल्हापूर – हातकणंगले, गडहिंग्लज

सांगली – कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *