News & View

ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण पाहता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या समिकरणामध्ये मोठा वाटा अजित पवार यांच्या पदरात पडण्याची देखील शक्यता आहे. या दृष्टीने मुंबईत राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे.

तब्बल नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले.शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 40 आणि अपक्ष 10 असे 50 आमदार बाहेर पडले.त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला.

गेल्या नऊ महिन्यात शिंदेसह 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू आहे.7 मे रोजी या याचिकेवर अंतिम निकाल येणे अपेक्षित आहे.हा निकाल विरोधात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने सेफ गेम खेळण्यास सुरवात केल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधीपक्ष नेते  अजित पवार हे आपल्या चाळीस आमदारांना घेऊन गायब झाल्याची चर्चा सुरू झाली.मात्र स्वतः अजित दादांनी माध्यमांसमोर येत या चर्चामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याची माहिती आहे.तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली आहे.या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस गावाकडे गेल्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चाना उधाण आले आहे. दिल्लीतील घडामोडी देखील वाढल्या असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. नव्या सरकारमध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होतील अथवा शिंदे अपात्र झाल्यास मुख्यमंत्री पदावर पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

या सर्व घटना घडामोडी पाहता मंत्रालयात देखील जुन्या कामांचा निपटारा करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *