छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ५५.७३ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील २१७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात एकूण १ लाख ६७ हजार ८८५ मतदार असून, त्यापैकी ९३ हजार ३१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६६ हजार ३८५ पुरुष, २६ हजार ९२८ महिला आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३९ हजार २७० पुरुष आणि १२ हजार ७३७ महिला मतदारांसह एकूण ५२ हजार ७ मतदारांनी मतदान केले होते. त्यानुसार पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ५९.१५, महिला मतदारांची ४७.३०, तर एकूण मतदानाची टक्केवारी ५५.७३ इतकी नोंदविण्यात आली.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील ७६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ६१.८१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्ह्यात एकूण २६ हजार ६८४ मतदार असून, त्यापैकी १६ हजार ४८२ मतदारांनी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २१ हजार १८६ पुरुष मतदारांपैकी १३ हजार ६८७, तर ५ हजार ४७८ महिला मतदारांपैकी २ हजार ७९५ महिलांनी मतदान केले. पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ६४.६०, तर महिला मतदारांची टक्केवारी ५१.०२ इतकी राहिली.



Leave a Reply