News & View

ताज्या घडामोडी

images 2026 10 08T204818.267

दुष्काळ -पाण्याचा कि विचार अन वृत्तीचा!

अब्जावधी च्या पाणी पुरवठा योजना, कोट्यावधीची वृक्ष लागवड तरीही दुष्काळ…………!

दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी शासन किंवा सो कॉल्ड सरकार, प्रशासन यांची धडपड सुरु आहे. मात्र दुष्काळ अचानक आलेला नाही, त्यासाठी आपण म्हणजे सामान्य माणूस आणि सरकार जबाबदार आहे.


गेल्या दहा वीस वर्षात कागदोपत्री लावली गेलेली झाडांची संख्या पाहिली तरी राज्यातच काय देशात दुष्काळ पडण्याची शक्यता नाही. गेल्या दहा बारा वर्षात देशात किंवा राज्यात पाणी पुरवठा योजनावर झालेला अब्जावधी रुपयांचा खर्च पाहिला तरी या देशात पुढचे शंभर वर्ष दुष्काळ सापडणार नाही अशी परिस्थिती आहे.


हे एवढ सगळं कशाला सांगायचं, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल हर घर जल अर्थात जल जीवन मिशन नावाची योजना सुरु करण्यात आली. या योजनेवर एकट्या महाराष्ट्रात आतापर्यंत 36 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे.


मात्र ज्या ज्या गावात ही योजना राबवण्यात आली त्या त्या गावात आज दुष्काळ गडद होताना दिसत आहे. याचा अर्थ राज्य सरकारने 36 हजार कोटी रुपये पाण्यात घातले आहेत.


साधारणपणे दहा पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने भारत निर्माण किंवा जलयुक्त शिवार तसेच स्वच्छ भारत मिशन अशा गोंडस नावाखाली पाणी पुरवठा योजना सुरु केल्या. या योजनेमधून नळाला पाणी आलं नाही मात्र सरकार मधील मंत्री, आमदार, गुत्तेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या घरी पैशाचा महापूर आला.


आता जल जीवन मिशन या द्वारे देखील हेच उद्योग सुरु आहेत.जेव्हा ही योजना सुरु झाली अन एका एका जिल्ह्यात एका एका गुत्तेदार ला शंभर दोनशे गावांची कामे मिळाली तेव्हाच ही योजना कागदावर राहणार अन पुन्हा दुष्काळ, पुन्हा टँकर सुरु होणार हा अंदाज आमच्यासहीत अनेकांनी बांधला होता. परंतु त्यावेळी मंत्रालयापासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी होती.
असाच काहीसा प्रकार वृक्ष लागवड बाबत आहे. विद्यमान सरकारने सुधीर मुनगुंटीवार वनमंत्री असताना 33 कोटी वृक्ष लागवड चा उपक्रम राबवला. त्यानंतर गतवर्षी देखील कोट्यावधी वृक्ष लावल्याचा दावा केला गेला. मग एवढी झाडं लावली तरी दुष्काळ का आहे वासून उभा आहे.


एकट्या बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात वन विभाग आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था मार्फत किमान पाच दहा कोटी झाडं लावली गेल्याचा दावा कागदावर दिसून येतो. मग ही झाडं लावली कुठं, पाणी पुरवठा योजना झाल्या कुठं, यावर जो अब्जावढी रुपयांचा खर्च झाला तो गेला कुठं या प्रश्नाची उत्तर सरकार देणार आहे का त्याचाही दुष्काळ पडलाय.

लक्ष्मीकांत रुईकर,
संपादक, न्यूज अँड व्यूज, बीड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *