News & View

ताज्या घडामोडी

IMG 20261004 WA0045 scaled

शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील -ना. पंकजा मुंडे!

बीड – महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता केंद्र आणि राज्याने नेहमीचे निकष बाजूला ठेवून बळीराजाला भरघोस मदत करण्यासाठी दुष्काळ जाहीर केला आहे शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी खचून न जाता या गंभीर संकटाला सामोरे जावे पशुधन आणि पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असून लवकरच भरीव मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.


यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची उभी पिके करपली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर,पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी बीड व पाटोदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी बीड व पाटोदा तालुक्यातील विविध दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी बीड तालुक्यातील वंजारवाडी, काकडहिरा, मुर्शदपूर, लिबांदेवी तसेच पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी नायगाव, रोहतवाडी, तांबा राजुरी, तळे पिंपळगाव, करंजवण आदी गावांमधील शेतशिवारात प्रत्यक्ष जात पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेतल्या. या कठीण काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. इतिहासात पहिल्यांदाच केंद्र आणि राज्याचे पारंपरिक निकष बाजूला सारून शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. प्रशासकीय यंत्रणेला पिकांच्या नुकसानीचे व पंचनाम्याचे काम अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तोंडावर आलेला सण पाहता, शासनाकडून शेतकऱ्यांच्या संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच ३२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असो वा इतर मदत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या या संवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला असून, प्रशासनाकडून मदतीची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू असल्याचेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *